जनावरांना चारा मिळेल का? पशुधन मालकांची नातेवाइकांकडे शोधाशोध | पुढारी

जनावरांना चारा मिळेल का? पशुधन मालकांची नातेवाइकांकडे शोधाशोध

 वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  चालू वर्षी पुरंदर तालुक्याच्या सर्व गावांमध्ये पावसाळ्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली होती. त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पशुधन सांभाळणार्‍या शेतकर्‍यांची एकमेकांच्या नातेवाइकांकडे ‘चारा मिळेल का चारा’? याबाबत शोधाशोध सुरू असल्याचे चित्र पुरंदर तालुक्यात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर खरीप हंगामात बहुतांशी शेतकरी मका, बाजरी, कडवळ, हत्तीघास, मेथी घास आदी पिकांची लागवड प्रामुख्याने करतात. या पिकांपासून उत्पादन कमी मिळाले तरी चालेल; परंतु जनावरांसाठी वर्षभर लागणारा चारा उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा पशुपालक शेतकर्‍यांना असते. मात्र, यावर्षी अपेक्षेचा भ्रमनिरास झाला आहे.

चालूवर्षी पावसाळ्यांच्या सुरुवातीस थोडाफार पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करून मका, बाजरी, कडवळ, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने व सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी असल्याने
नद्या-नाले, ओढे, तलाव, बंधारे, विहिरींनाही पाणी आले नाही. परिणामी, या पिकांना पाणी देता न आल्याने शेतातील पिके जळून खाक झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच; परंतु केलेला खर्चही निघाला नाही आणि चाऱ्याचे उत्पादनदेखील झाले नाही.

असा मिळतो चारा
पाणलोट क्षेत्रातील तसेच ज्यांच्याकडे जनावरे नाहीत, अशा शेतकर्‍यांकडे मका, कडवळ पिकांचा चारा उपलब्ध आहे; परंतु हा चारा मिळविण्यासाठी काढणी, कापणी करण्यासाठी लागणारी मजुरी शेतकर्‍याला द्यावी लागते. यासाठी एकरी किमान सहा ते सात हजार रुपये खर्च येतो. एक एकरात साधारणतः दीड ते दोन ट्रॉली चारा उपलब्ध होतो.

चालूवर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच, जनावरांना किमान चार महिने पुरेल इतकाही चारा शेतातून मिळालेला नाही. जनावरांसाठी, दुसर्‍या तालुक्यातील गावाहून चारा विकत घेण्याची वेळ आली आहे.
                                                          – जयवंत भुजबळ, पशुपालक, वाल्हे.

राज्य शासनाने पुरंदर तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर केला आहे. आमच्या परिसरात नेहमीच दुष्काळ असतो; पण कोणतीही लाभ मात्र मिळत नाही. यावर्षी जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत अन्यथा चारा उपलब्ध होत नसल्याने, पशुधन विक्रीस काढण्याशिवाय तसेच हे पशुधन कवडीमोल किंमतीत विकण्याशिवाय पशुपालकास पर्याय उरणार नाही.
                                                                     – तानाजी पवार, शेतकरी, वाल्हे.

Back to top button