सातारा : जिल्ह्यातील शासकीय कामकाज कोलमडले | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील शासकीय कामकाज कोलमडले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदांची भरती करावी, यासह विविध मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी संप केल्यामुळे शासकीय कामे ठप्प झाली. गुरुवारी सकाळी कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुक्यात ठिकठिकाणी निदर्शने केली; तर जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, संपात 25 हजारांवर कर्मचारी सहभागी झाले होते.

जिल्हा परिषदेतील बहुतांशी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अधिकार्‍यांनीही सामूहिक रजा टाकली. तर काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काही कार्यालयात एखादा-दुसरा कर्मचारी काम करताना दिसून आला. तरीही दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट दिसून आला. बहुतांशी कार्यालयांना टाळा लागला होता. तसेच संपाची माहिती असल्याने नागरिकही कमी प्रमाणात दिसून आले. तर जिल्हाधिकारी कार्यालयातही संपाचा फिव्हर दिसून आला. वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर विविध मागण्यांचे निवेदन घेऊन येताना काही नागरिक दिसून आले.

सातारा जिल्ह्यातीलही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले होते. तसेच शिक्षकांचाही या संपात समावेश होता. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला. संपात राज्य सरकारी कर्मचारी 17 हजार 350, जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी शिक्षकांसह 12 हजार 700, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर 2 हजार 100, उच्च माध्यमिक व शिक्षकेत्तर 700 तर नगरपंचायत अन् नगरपालिका 350 कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

Back to top button