उन्मत पर्यटकांमुळे सिंहगड घाटरस्त्यावर दीड तास कोंडी | पुढारी

उन्मत पर्यटकांमुळे सिंहगड घाटरस्त्यावर दीड तास कोंडी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड किल्ल्याच्या घाटरस्त्यावरील मोरदरी खिंडीत वाहने उभी करून मौजमजा करणार्‍या उन्मत पर्यटकांमुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी घाटरस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. अरुंद असलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दूर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सुमारे दीड तास पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडले. दरम्यान, गडावर दिवसभरात वीस ते पंचवीस हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली.

संबंधित बातम्या :

रविवारी दिवसभर सिंहगडावर पर्यटकांनी उच्चांकी गर्दी केली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास घाट रस्त्यावरील मोरदरी खिंडीत अनेक उन्मत्त पर्यटकांनी चारचाकी, तसेच दुचाकी वाहने उभी केली. वाहने उभी करून जवळच्या डोंगर टेकड्यावर पर्यटक मौजमजा करत होते, त्यामुळे गडावरून खाली येणार्‍या व गडावर जाणार्‍या वाहनांचा मार्ग बंद होऊन प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एक ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीत दीड ते दोन तास पर्यटक अडकून पडले. वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने तेथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षारक्षक धावपळ करत होते. दुपारी चारच्या सुमारास वाहतूक ठप्प पडल्याने सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील, संदीप कोळी, नितीन गोळे यांनी सुरक्षारक्षकांसह धाव घेतली.

दीड तासाच्या धावपळीनंतर कशीबशी मंदगतीने वाहतूक सुरू झाली. गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल होऊन थेट कोंढणपूर फाट्यापर्यंत ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली. सकाळपासून मात्र डोणजे गोळेवाडी तसेच कोंढणपूरमार्गे वाहतूक सुरळीत होती. दरम्यान, खडकवासला धरणाच्या चौपाटीसह राजगड, तोरणा किल्ल्यावरही दिवसभरात पर्यटकांनी गर्दी केली होती.

दिवसभरात 1789 वाहनांची नोंद

सिंहगडावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांकडून वनविभागाने टोल भरण्यासाठी ऑनलाईन पैसे देण्याची सक्ती केली आहे. त्याचा मोठा मनस्ताप पर्यटकांना सहन करावा लागत आहे. रविवारी दिवसभरात पर्यटकांकडून सव्वा लाख रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. दिवसभरात 529 चारचाकी व 1360 दुचाकी वाहने गडावर आल्याची नोंद झाली.

सिंहगड घाटरस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई आहे असून, त्याबाबतचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, काही पर्यटक रस्त्यातच वाहने उभी करत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे.
                                            – समाधान पाटील, वनपरिमंडळ अधिकारी

Back to top button