धार्मिक पर्यटनामध्ये कोपरगावला प्राधान्य द्यावे : आ. आशुतोष काळे | पुढारी

धार्मिक पर्यटनामध्ये कोपरगावला प्राधान्य द्यावे : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव मतदार संघातून पवित्र गोदावरी नदी वाहते. मतदार संघाला मोठा ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक वारसा लाभला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील धार्मिक स्थळांचा विकास व्हावा, यासाठी जिल्हा धार्मिक पर्यटन आराखड्यात कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आ. काळे पत्रात म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघास धार्मिक व पौराणिक वारसा लाभला आहे. मतदार संघात अनेक धार्मिक स्थळे आहेत. कोपरगावात नगर-मनमाड महामार्गावर शिर्डीचे श्रीसाईबाबांचे तपोभूमी मंदिर, बेट भागात गोदाकाठी जगातील एकमेव श्रीगुरु शुक्राचार्य महाराज मंदिर, श्रीजनार्दन स्वामी महाराज आश्रम, कोकमठाण येथे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, पुणतांबा येथे श्रीचांगदेव महाराज देवस्थान, वाकडी येथे प्रती जेजुरी श्रीखंडोबा देवस्थान, जुनी गंगा देवी, दत्तपार, श्रीगोपाजी बाबा देवस्थान, श्रीरेणुकादेवी देवस्थान मायगाव देवी, पेशवेकालिन राघोबादादा वाडा आदी धार्मिक व ऐतिहासिक स्थळे आहेत.

श्रीक्षेत्र शिर्डीजवळ असल्याने शिर्डीला येणारे काही भाविक आवर्जून या धार्मिक स्थळांना भेटी देतात. क वर्ग दर्जाप्राप्त वारीचे श्रीरामेश्वर देवस्थान, कान्हेगावचे श्रीनरसिंह देवस्थान, कोकमठाणचे लक्ष्मीमाता देवस्थान, पोहेगावचे श्रीमयुरेश्वर देवस्थान, चांदेकसारेचे श्रीकालभैरव देवस्थान, ब्राम्हणगावचे श्रीजगदंबा माता देवस्थान, माहेगाव देशमुख येथे श्रीअमृतेश्वर देवस्थान, कोळपेवाडीचे श्रीमहेश्वर देवस्थान, संवत्सरचे श्रीश्रृंगेश्वर ऋषी देवस्थान, कुंभारीचे श्रीराघवेश्वर देवस्थान, चासनळीचे जगदंबा माता देवस्थान, उक्कडगावचे रेणुकामाता देवस्थान आदी मोठी व ग्रामीण नागरिकांची अपार श्रध्दा असेलले विख्यात धार्मिक स्थळे आहेत, परंतु या धार्मिक स्थळांचा भाविकांना अपेक्षित विकास झाला नाही.

यामुळे भाविकांसह पर्यटकांना या धार्मिकस्थळी सोयी- सुविधा मिळत नाही. कोपरगाव मतदार संघाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मतदार संघातील सर्व धार्मिक स्थळांचा विकास करणे गरजेचे आहे. यामुळे व्यवसाय वृद्धी होवून आर्थिक उलाढाल वाढेल. यामुळे जिल्हा धार्मिक पर्यटन आराखड्यात कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आ. काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे केली.

हेही वाचा

दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार : दूधउत्पादनकांचा इशारा

गडचिरोली: पिकांची राखण जीवावर बेतली, रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार

सफाई, विद्युत कर्मचार्‍यांची भूमिका महत्त्वाची : प्रवीण कुमार पाटील

Back to top button