Mental Health awareness : मानसिक आजार कलंक नाही, लक्षणे ओळखून वेळेत उपचार आवश्‍यक | पुढारी

Mental Health awareness : मानसिक आजार कलंक नाही, लक्षणे ओळखून वेळेत उपचार आवश्‍यक

डॉ. मनोज कुंभार

मानसिक त्रास, आजार किंवा विकार हा काही कलंक नाही. त्याची लक्षणं ओळखणं आणि त्यावर वेळीच उपचार मिळवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर अथवा प्रशिक्षित समुपदेशकाची मदत मिळवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते मानसिक त्रास वा आजाराशी दोन हात करत असलेल्या व्यक्तीला समजून घेणं आणि जमेल ती सर्व मदत उपकार म्हणून नाही तर मानवतेच्या आणि सहानुभूतीच्या विचारातून! ( Mental Health awareness)

जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याची परिभाषा पुढीलप्रमाणे दिली आहे. मानसिक स्वस्थता ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते. थोडक्यात असे म्हणता येईल की मानसिक आरोग्य हे व्यक्तीच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी आणि सामाजिक द़ृष्टीने प्रभावी कार्यासाठी मूलभूत आहे.

Mental Health awareness : मानसिक आजारांबाबत अनेक गैरसमज

शैक्षणिक निकाल, उत्पादनक्षमता, सकारात्मक व्यक्तिगत संबंधाचा विकास, गुन्हेगारीचे दर, मद्य आणि अमली पदार्थाचे वाईट उपयोग/व्यसन अशा संदर्भाने मानसिक आरोग्याचा प्रभाव दिसतो. संदिग्धता आणि निश्चित लक्षणे नसल्याने मानसिक आरोग्य व विकाराचा निदान करणे कठीण जाते; पण अनेक गोष्टी लक्षात येऊनही, अनेक घटना घडूनही, मानसिक अक्षमतेची चिन्हे दिसूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मानसिक विकार हे कलंक मानले जातात त्यामुळे अशा व्यक्ती औषधोपचार घेण्यास वेळ लावतात. अनेकांना असे वाटते की मानसिक विकार हे अशा व्यक्तींना होतात ज्या मानसिक रीतीने कमजोर असतात किंवा भूतबाधित असतात. खूप लोकांचे असे मत आहे की मानसिक विकार अपरिवर्तनीय आहे आणि त्यावर उपचार करण्यात काही अर्थ नाही. खूप लोक असे मानतात की प्रतिबंधात्मक उपचार सफल होण्याची शक्यता कमी असते. खूप लोकांचा असा विश्वास आहे की मानसिक विकाराच्या उपचारात वापरली जाणारी औषधे फक्त झोप येण्यासाठी दिली जातात. पण यात तथ्य नाही, हे आता पुरेसे सिद्ध झाले आहे.

Mental Health awareness : मानसिक विकार कशामुळे हाेताे

मानसिक विकार कशामुळे होतो, याविषयी भरपूर संशोधन झाले आहे आणि चालू आहे. त्यानुसार आढळलेली कारणे पुढीलप्रमाणे- मानसिक विकाराचा संबंध आपल्या मेंदूमध्ये असलेल्या न्यूरो ट्रांसमिटर्सच्या असंतुलनाशी आहे. हे आपल्या मेंदूच्या पेशींना एकमेकांशी संपर्क साधण्यास मदत करतात. जर ह्या रसायनांचे संतुलन बिघडले किंवा यांनी व्यवस्थित काम केले नाही तर, मेंदूतून संदेश बरोबर पार होत नाही. त्यातून मानसिक विकाराची लक्षणे दिसतात. बरेच मानसिक विकार परिवारात आनुवंशिक असतात. असे म्हणता येईल की ज्या व्यक्तीच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीला मानसिक विकार असेल तर त्या व्यक्तीलाही मानसिक विकार होण्याची जास्त शक्यता आहे. अशी शक्यता जनुकांमुळे निर्माण होते. विशेषज्ञ असे मानतात की, मानसिक विकाराचा संबंध जनुकांमधील अनियमिततेशी आहे; पण फक्त एखाद्या जनुकाशी नाही. म्हणून एखादी व्यक्ती मानसिक विकाराबाबत अतिसंवेदनशील असली तरी तिला मानसिक विकार होईलच, असे नाही. मानसिक विकार हे विविध जनुकांच्या अन्योन्यक्रियेने तसेच तणाव, वाईट गोष्ट किंवा धक्कादायक घटना घडणे अशा इतर घटकांमुळे होतात. ह्याने एखाद्या मानसिकद़ृष्ट्या अतिसंवेदनशील व्यक्तीवर मानसिक विकाराचा प्रभाव पडू शकतो किंवा त्याच्या संदर्भाने मानसिक विकार सक्रिय होऊ शकतो. काही संसर्ग असे आहेत, जे आपल्या मेंदूला नुकसान पोहोचवू शकतात आणि त्यातून मानसिक विकार विकसित होऊ शकतो किंवा असलेल्या विकारात वाढ होऊ शकते. मेंदूत दोष झाल्यास किंवा मेंदूच्या काही भागास इजा झाल्यास त्याचा संबंध मानसिक विकारांशी असू शकतो. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरणाचा संबंध फक्त मानसिक विकाराशी नाही तर मानसिक आरोग्याचा सर्वसमावेशक प्रचार आणि जागरूकतेशीदेखील असणे किती आवश्यक आहे, हे आपल्या लक्षात येईल.

तज्ज्ञ डॉक्टर अथवा प्रशिक्षित समुपदेशकाची मदत मिळवणं हे सर्वात महत्त्वाचं

मानसिक त्रास, आजार किंवा विकार हा काही कलंक नाही. त्याची लक्षणं ओळखणं आणि त्यावर वेळीच उपचार मिळवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर अथवा प्रशिक्षित समुपदेशकाची मदत मिळवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते मानसिक त्रास वा आजाराशी दोन हात करत असलेल्या व्यक्तीला समजून घेणं आणि जमेल ती सर्व मदत उपकार म्हणून नाही तर मानवतेच्या आणि सहानुभूतीच्या विचारातून!

आजघडीला असेही आढळून येते की, वेळीच आणि विज्ञाननिष्ठ समुपदेशन मिळाले नाही तर काहीजण मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी म्हणून एखाद्या व्यसनाचा आधार घेतात आणि समस्या आणखी अवघड करून ठेवतात. अशा व्यक्ती स्वत:चा विकास करून घेण्यास असमर्थ तर असतातच पण घरच्यांसाठीही त्या एक समस्या होऊन बसतात. म्हणूनच मानसोपचाराची तसेच समुपदेशन केंद्राची उपलब्धता ही काळाची गरज ठरली आहे. समुपदेशनाद्वारे व्यक्तीला तिच्या तात्कालिक समस्येतून बाहेर येण्यास मदत केली जाते. पण भविष्यात जर पुन्हा समस्या उत्पन्न झाली तर स्वबळावर त्या समस्येतून बाहेर पडू शकेल इतपत व्यक्तीचा आत्मनिर्भर बनवण्यावरही भर दिला जातो. मुख्य म्हणजे समुपदेशन ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या विचारांना वळण देऊन आपणच आपली समस्या सोडवू शकू, इतका विश्वास समुपदेशक समस्याग्रस्त व्यक्तीला मिळवून देतो.

Mental Health awareness : प्रत्येक समस्येसाठी औषधाचीच गरजेचे नसते

प्रत्येक समस्येसाठी औषधाचीच गरज असते असे नाही. अभ्यासात मागे पडणार्‍या अनेक मुलांच्या बाबतीत संबंधित मूल आणि पालक यांच्या समुपदेशनाचा उपयोग होऊ शकतो. अभ्यासात मुलाची प्रगती दिसत नाही, त्यावेळी मुलाचा बुद्ध्यांक काढून अभ्यासात प्रगती न होण्याच्या लेखन-वाचन कौशल्यांचा अंदाज, स्मरणशक्ती, आकलनक्षमता, निरीक्षणशक्ती, एकाग्रता इत्यादी कारणांचा शोध घेतल्यास प्रश्न सोडवण्याची दिशा सापडते. तसेच जिद्द, चिकाटी, आळस, नकारात्मक वृत्ती आणि शाळेतील समस्यांबद्दल जाणून घेऊन त्याप्रमाणे मार्गदर्शन केल्यास आणि आवश्यक कौशल्ये शिकविल्यास मुलांमध्ये अनेकदा आश्चर्यकारक प्रगती झालेली दिसते. शालेय प्रगती, पालकत्व इथपासून वैवाहिक विसंवाद आणि मानसिक आजारांपर्यंतच्या अनेक बाबतीत समुपदेशकाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. हल्लीच्या काळात वाढत्या ताणतणावांच्या आणि अघोरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तर अशा समुपदेशकांची गरज दिवसागणिक वाढतच चालली आहे. फक्त योग्य वेळी योग्य समुपदेशकाकडे जाणे आणि समुपदेशकाच्या मार्गदर्शनाद्वारे स्वत:च्या समस्येकडे नव्याने पाहायला शिकणे, समस्या हाताळण्याचे मार्ग शिकणे हे महत्त्वाचे ही जणू आजच्या काळाची गरज बनते आहे.

पालकांसाठी ‘या’ गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात

आज आपण सगळेजण अनुभवतो आहोत की, समाजात आज जीवघेणी स्पर्धा आहे. जीवन अतिरेकी धावपळीचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर जर पुढच्या पिढ्यांचे मानसिक स्वास्थ्य सुद़ृढ असावे, असे वाटत असेल तर मानसिक आरोग्याचे महत्त्व आपण मोठ्या माणसांनी सर्वप्रथम जाणले पाहिजे. त्यांना समुपदेशनाची, मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज पडू नये यासाठी त्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांचे मनोबल व मानसिक संतुलन अबाधित ठेवण्यासाठी मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक काळजी पालकांनी जाणीवपूर्वक घेतली पाहिजे. त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. लहान मुले आपल्याला वेळोवेळी समजून घेत असतात, त्यामुळे त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. घरी असताना एकत्र चहा घेणे, निदान रात्रीचे जेवण एकत्र घेणे, घराशी संबंधित बाबींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांना मान देणे अशा गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात.

मानसिक स्वास्थ्य जपण्‍यासाठी ‘या’ बाबींकडे लक्ष द्‍या

आणखीही काही मुद्दे आजच्या टेन्शनमय जगात आपण ध्यानात घ्यायला हवेत. प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष द्यायला हवे. ताणतणाव दूर ठेवण्यासाठी काही ना काही छंद प्रत्येक व्यक्तीने आवर्जून जडवून घेतला पाहिजे. त्यासाठी आपली आवड काय आहे, हे व्यक्तीने ओळखले पाहिजे. वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे, सायकल चालविणे, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, अशा कुठल्या ना कुठल्या छंदात मन गुंतवले पाहिजे, जेणेकरून आपले मानसिक आरोग्य जपायला मदत होईल. शिवाय प्रत्येक व्यक्तीने आपले विचार अनियंत्रित होऊ नये म्हणून योग आणि ध्यानधारणेचा मार्ग सातत्याने उपयोगात आणला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी. त्यामुळे मन समतोल राहण्यास मदत होते. आपण मनाला सतत सकारात्मक सूचना देत राहिले पाहिजे.

संकटाला कसे सामोरे जातो, तेही खूप महत्त्वाचे

मानसिक स्वास्थ्याचा विचार करताना आयुष्यात आपण संकटाला कसे सामोरे जातो, तेही खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण नशिबाला दोष देत बसतो, पण खरंतर आपण संकटाला संधी समजलो तर ते आव्हान पेलू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो. म्हणून व्यक्तीने भविष्याचा अतिविचार न करता, वर्तमानकाळ कसा चांगला होईल हे पाहिले पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहिले पाहिजे.

 

हेही वाचा: 

Back to top button