डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : प्रत्यक्ष खटला सुरू होण्यापूर्वी विस्मयकारक घडामोडी | पुढारी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : प्रत्यक्ष खटला सुरू होण्यापूर्वी विस्मयकारक घडामोडी

महेंद्र कांबळे

पुणे : पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर तपास सुरू झाला खरा; परंतु ‘गोल्डन हावर’मध्ये ज्या पद्धतीने आरोपीचा माग काढण्यासाठी धागे-दोरे मिळाले पाहिजे ते मिळालेच नाहीत. मात्र, त्यानंतर घडलेल्या काही घटना विस्मयकारक होत्या आणि त्यांची राज्यभर अनेक महिने चर्चा होत राहिली.

पोलिसांकडून खून झालेल्या परिसरातील हजारो कॉल तपासले गेले. हिंदुत्ववादी संघटना, भोंदूबाबा, सराईत गुन्हेगार सर्वच पातळीवर पुणे पोलिस आणि एटीएसचा तपास सुरूच होता. त्यावेळी अनेकांची चौकशी करण्यात आली. सर्व बाजू तपासण्यात आल्या. यादरम्यान पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर हा तपास सीबीआयने हाती घेतला व आरोपींना अटक झाल्यानंतर खटला उभा राहिला.

दाभोलकरांचा (Narendra Dabholkar) खून झाला त्या दिवशीच मुंब्रा पोलिसांनी मनीष रामविलास नागोरी, राहुल माळी, विकास खंडेलवाल यांना ठाण्यातून खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले 7.65 एमएम कॅलिबरचे पिस्तूल आणि दाभोलकर हत्याकांडात वापरलेले पिस्तूल एकच असल्याचा व दोन्ही गुन्ह्यातील पिस्तूल एकच असल्याने ही अटक करण्यात आली असल्याचा दावा तपास यंत्रणेने न्यायालयात केला होता. मात्र, पुढे हा दावा टिकला नाही. या दोघांचे नाव नंतर सीबीआयने तपास केलेल्या आरोपपत्रात आलेच नाही. अन् त्यांच्यावर दाभोलकर प्रकरणात कोणतेही आरोप ठेवण्यात आले नाही.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआय, सीआयडीकडे जाऊ नये म्हणून पोलिस या दोघांना अटक दाखवून प्रकरण उलगडले असल्याचा बहाणा करत असल्याचा आरोपही वकिलांकडून करण्यात आला होता. ऑगस्ट 2018 रोजी सचिन अंदुरे नंतर शरद कळसकर, अमित दिगवेकर, अमोल काळे, राजेश बंगेरा यांना याप्रकरणी अटक झाली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यासाठी बंगळूर येथील पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने, दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा औरंगाबादचा हल्लेखोर सचिन अंदुरे यास पिस्तुल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला.

आरोपपत्रात काय होते?

डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येनंतर पाच वर्षांनी सीबीआयने पुणे येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यात दाभोलकर यांच्या हत्येचा कट सनातनचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याने रचला. सनातन संस्थेशी संबंधित सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी हा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. आरोपपत्रात तावडे आणि सारंग अकोलकर याच्या घरातील काही कागदपत्रे अशी सुमारे 200 टिपणे यावेळी न्यायालयात सादर करण्यात आली होती. हिंदू देवी-देवतांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आणि विरोध केल्यामुळेच दाभोळकर यांची हत्या झाल्याचाही निष्कर्ष सीबीआयने काढला होता.

हेही वाचा : 

Back to top button