International Men’s day 2023 | पुरुषांमध्‍ये वाढतंय नैराश्य! जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय | पुढारी

 International Men's day 2023 | पुरुषांमध्‍ये वाढतंय नैराश्य! जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

सोनाली जाधव

:
“चार भिंतीत राहिल्‍याने बायकांचा मानसिक कोंडमारा होतो” हे वाक्य तुम्ही बऱ्यावेळा ऐकले असेल; पण कधी एखादा पुरुष नैराश्यात आहे. त्याचा कोंडमारा होतोय हे वाक्य क्वचित ऐकलं असेल. मात्र गेल्या दाेन दशकांचा विचार करता पुरुषांच्यामधील नैराश्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्‍याचे चित्र आहे. आज जागतिक पुरुष दिन. त्यानिमित्ताने आपण पुरुष आणि त्यांना येणारे नैराश्य, त्याची लक्षणे आणि त्यावरील उपाय हे जाणून घेवूया. (International Men’s day 2023)

पुरुषांमधील नैराश्याचे प्रमाण वाढत आहे…

नैराश्य हे कोणालाही येवू शकते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते; पण अलीकडे काही अहवाल असे सांगतात की पुरुषांमधील नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. WHO चा एक अहवाल अस सांगतो की, जगातील अंदाजे २८० दशलक्ष लोकांना नैराश्य आहे. ज्यात ५ टक्के प्रौढ जे ६० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत (४ टक्के पुरुष आणि ६ टक्के महिला) आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ५.७ टक्के प्रौढांचा समावेश होतो. तर जगभरात, १० टक्क्यांपेक्षा जास्त गरोदर स्त्रिया आणि ज्यांनी नुकताच मुलाला जन्म दिला आहे अशा स्त्रियांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे.

International Men’s day 2022 : पुरुष रडला तर…

आपल्या सभाेवताली असलेला एखादा पुरुष रडला तर तुमची काय प्रतिक्रिया असते; बऱ्याचवेळा आश्चर्याची असते; पण एक अहवाल असे सांगतो की, पुरुषालाही दु:ख झाले तरी तो चारचौघांमध्‍ये मोकळेपणाने व्‍यक्‍त होत नाही. यातूनच पुरुषांचा मानसिक कोंडमारा सुरु होताे. यातूनच ताण-तणावात वाढ होते. याचा परिणाम त्‍याच्‍या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर होत असतो. पुरुष आणि दु:ख हे समीकरण बऱ्याच जणांना पचनी पडत नाही. 

पुरुषांच नैराश्य आणि संशोधन काय सांगते ?

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या एका अहवालानुसार, ३०.६ टक्के लोक हे आपल्या आयुष्यात कधी ना कधी नैराश्याने त्रस्त असतात. नैराश्याने त्रस्त असलेला पुरुष आपल्या आरोग्याची स्थिती माहित असूनही हॉस्पिटल किंवा त्या संबधीत वैद्यकीय मदत घेण्यास टाळतात. पुरुषाची हीच वृत्ती त्याच्या नैराश्यात वाढ होण्यास कारणीभूत ठरते. अशा स्थितीत पुरषांनी आपल्या नैराश्यावर मनमोकळेपणाने बोलायला हवं. आपल्याला काय वाटते हे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात व्यक्त व्हायला हवं.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार प्रत्येक पुरुषाच्या नैराश्याची लक्षणे ही वेगवेगळी पाहायला मिळतात. नैराश्यात राहणाऱ्या प्रत्येक पुरुषाची कारणे आणि लक्षणे ही एकसारखी नसतात. काही पुरुषांमध्ये नैराश्याची कारणे ही जास्त तर काही पुरुषांमध्ये नैराश्याची कारणे कमी पाहायला मिळतात. तर काहींच्यामध्ये मध्यम लक्षणे पाहायला मिळतात.

 International Men’s day 2023 : नैराश्याची सर्वसामान्य लक्षणे

  • राग, चिडचिडीपणा किंवा आक्रमकता.
  • चिंता, अस्वस्थता, स्वत:ला एकाकीपणा जाणवणे.
  • करत असलेलं काम, परिवार, किंवा एखाद्या आनंदायी क्षणात रस न दाखवणे.
  • लैंगिक समस्या.
  • उदास किंवा निराश वाटणे.
  • एकाग्रता न होणे.
  • खूप थकवा जाणवणे, झोप न येणे किंवा झोप जास्त येणे.
  • गरजेपेक्षा जास्त खाणे किंवा काही खायची इच्छा न होणे.
  • आत्महत्याचा विचार येणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे.
  • अंगदुखी, डोकेदुखी, पचनाचा त्रास होणे.
  • व्‍यसनांच्‍या आहारी जाणे.

 International Men’s day 2023 : नैराश्याची कारणे

  • आजार
नैराश्य हे काही गंभीर आजारांमुळेही येत असते. जसे की, मधुमेह, कॅन्सर, ह्रदयविकार यासारखे बरेच आजार हे नैराश्याला कारणीभूत ठरत असतात. या आजारांसाठी जे वैद्यकीय उपचार घेतले जातात ते नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात.
  • वैयक्तिक आणि इतर कारणे

आर्थिक नुकसान, जवळच्या व्यक्तीचा मृत्‍यू, नात्यांमध्ये ताणतणाव, दुरावा, आयुष्यात अचानक झालेला बदल अशी बरीच कारणे आहेत जी पुरुषांच्या नैराश्याला कारणीभूत ठरतात.

नैराश्‍यावर मात करता येते

  • पुरुष आपल्या भावना सहसा करुन व्यक्त करताना दिसत नाही. नैराश्यात तो एकाकी राहायला लागतो. तुम्ही नैराश्याची लक्षणे ओळखून तज्‍ज्ञ डॉक्टरांकडे घेवून जा किंवा त्याला जाण्यास प्रवृत्त करा.
  • नैराश्यात काहीवेळा ‘टॉक थेरपी’ ही उपयोगी पडते. काहीवेळा वैद्यकीय उपचाराऐवजी या थेरपीचा उपयोग होतो. या उपचार पद्धतीत ज्या व्यक्तीला नैराश्य आले आहे. त्याच्याशी संवाद साधून त्याच्या समस्या समजून घेतल्या जातात. नैराश्य कमी करता येत हे पटवून दिले जाते. उपचार केले जातात.
  • तुम्हाला एखादी व्यक्ती ताणतणावात आहे अस जाणवत असेल. आणि ती व्यक्ती आत्महत्या संदर्भात काही बोलत असेल तर त्या व्यक्तीला टाळू नका. ती व्यक्ती का म्हणतेय हे समजून घ्या. त्या व्यक्तीला समजावुन सांगा. धीर द्या. आयुष्याबद्दल सकारात्मक सांगा.
  • एखादा पुरुष नैराश्याला सामोरे जात असेल तर त्या व्यक्तीला धीर द्या. त्याला समजावून सांगा की नैराश्य हा मानसिक आजार बरा होवू शकतो हे पटवून द्या. त्याच्या क्षमतांची ओळख करुन द्या. आयुष्याबद्दल सकारात्मक बोलून जगण्याबद्दल उत्सुकता निर्माण करा.

 International Men’s day 2023 : स्वत:साठी वेळ आहे का?

बहुतांश पुरुष हे कुटुंबाच्‍या जबाबदारी आणि वाढत्‍या गरजांमुळे दबावाखाली दिसतील. कित्येक पुरुषांना स्वत:साठी वेळ नसतो. तुम्ही तुमच्या आजुबाजुच्या नात्यातील पुरुषांना विचारलं की, तुम्ही किती वेळ देता स्वत:साठी तर हाताच्या बोटावर मोजण्या इतपत पुरुष उत्तर देतील की, “हो, आम्ही स्व:तासाठी वेळ देतो”.

हेही वाचा 

Back to top button