सिंधुदुर्ग ; पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन | पुढारी

सिंधुदुर्ग ; पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

वेंगुर्ले ; पुढारी वृत्तसेवा 2022-23 मधील पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने मंडळ कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. 23 नोव्हेंबर पर्यंत विमा नुकसान भरपाई जमा करण्यात न आल्यास शेतकऱ्यांच्या वतीने संघटित होऊन तालुका कृषी विभागाला शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड महसूल मंडळातील पाल, तुळस, होडावडे, मातोंड या गावातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही. 2023 – 24 मधील पीक विमा भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर असून, शेतकऱ्यांना पीक विम्याची हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने रखडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी चालू वर्षी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार आहे. वारंवार संबंधित विभागास निवेदने देऊनही लक्ष न पुरविल्याने आज शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी निरंजन देसाई हे उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी पीक विमा नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत आदी घोषणा यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी मंडळ कृषी अधिकारी हर्षा गुंड यांच्याशी शेतकऱ्यांच्या वतीने दीर्घकाळ चर्चा करण्यात आली.

यावेळी मातोंड सर्कल हे गेल्या दोन वर्षामध्ये सुरू झाले असून, यात नवीन सर्कलचे मॅपिंग करण्यात येत आहे. तसेच पीक विमा नुकसान भरपाई बाबत प्राप्त निवेदने व मागण्या आपल्या स्तरावरून वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येत आहेत. पीक वीमा नुकसान भरपाईबाबत संबंधित वीमा कंपनी व वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येत असल्याचे मंडळ कृषी अधिकारी हर्षा गुंड यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा विमा प्रतिनिधी सिद्धेश येडवे, तालुका विमा प्रतिनिधी नयन सावंत आदी उपस्थित होते. तर विमा कंपनी व्यवस्थापक प्रमोद पाटील यांच्याशी संपर्क होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.

दरम्यान याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने 24 नोव्हेंबर रोजी कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा अल्टीमेटम शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात शेतकरी संघटक श्यामसुंदर राय, माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र परब, रविकिरण परब, माजी सभापती यशवंत परब, भाजपचे मातोंड शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, पेंडूर सरपंच संतोष गावडे, दिपक गावडे, मधुकर गावडे , मुकुंद नाईक , मातोंड ग्रा.पं. सदस्य दिपेश परब ,प्रसाद मराठे ,रामचंद्र सावंत ,गोविंद गोळम, बुधाजी कोंडये ,सुभाष भगत , यशवंत भगत ,नारायण गावडे ,प्रल्हाद राणे ,सोमा परब, अभिषेक परब ,प्रदीप सावंत, सुभाष परब , हर्षल परब ,सुधाकर सावंत , संजीव परब ,विनोद चव्हाण, जगदीश परब ,उत्तम नाईक, जनार्दन गावडे ,किशोर परब, स्वप्निल परब आदींसह तुळस, पाल ,होडावडे, मातोंड या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, पेंडूर सरपंच संतोष गावडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या वतीने समस्या मांडल्या.

हेही वाचा : 

Back to top button