Tesla कधी करणार भारतात एंट्री; प्लांट कुठे? गुजरात की महाराष्ट्र, माहिती आली समोर | पुढारी

Tesla कधी करणार भारतात एंट्री; प्लांट कुठे? गुजरात की महाराष्ट्र, माहिती आली समोर

पुढारी ऑनलाईन : भारत आणि अमेरिकेची वाहन निर्माता कंपनी टेस्ला इंक यांच्यातील करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. यानुसार टेस्लाला पुढील वर्षापासून देशात इलेक्ट्रिक वाहने आयात करण्यास आणि दोन वर्षांच्या कालावधीत उत्पादन प्लांट उभारण्यास परवानगी दिली जाणार आहे, असे वृत्त भारत सरकारच्या योजनांची माहिती असलेल्या स्त्रोतांचा हवाल्याने ब्लूमबर्गने दिले आहे.

जानेवारीत होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे एका सुत्राने म्हटले आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांचा या टेस्लाच्या प्लांटसाठी विचार केला जात आहे. कारण या राज्यांत पायाभूत सुस्थितीत आहेत.

संबंधित बातम्या 

  • टेस्लाची भारतात गुंतवणूक

वृत्तात असेही सुचवण्यात आले आहे की टेस्ला भारतातील एका नवीन प्लांटमध्ये सुरुवातीला सुमारे २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. भारताकडून १५ अब्ज डॉलर पर्यंतचे ऑटो पार्ट्स खरेदी करण्याची त्यांची योजना आहे. ही कंपनी खर्च कमी करण्यासाठी भारतात काही बॅटरींचे उत्पादन घेण्याच्या विचारातही आहे.

दरम्यान, या योजनांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही आणि त्यात बदल होऊ शकतो. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी जूनमध्ये म्हटले होते की टेस्लाचा भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्याचा मानस आहे आणि २०२४ मध्ये भारत दौऱ्यावर येण्याची त्यांची योजना आहे. पण आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या एकूण प्रवासी वाहनांपैकी केवळ १.३ टक्के इलेक्ट्रिक कार आहेत. इलेक्ट्रिक कार महाग आहेत आणि जास्त चार्जिंग स्टेशन नाहीत, हे यामागील कारण आहे.

टेस्ला सध्या भारतात थेट कार आयात करत नाही. कारण आयात शुल्क अधिक आहे. पण जेव्हा स्थानिक पातळीवर याचे उत्पादन सुरु होईल तेव्हा त्या कारची किंमत २० हजार डॉलर इतकी कमी असू शकते.

पियूष गोयल यांची अमेरिकेतील टेस्ला कारखान्याला भेट

गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी अमेरिकेतील फ्रेमोंट येथील टेस्ला कारखान्याला भेट दिली होती. इथे पियूष गोयल एलोन मस्क यांना भेटणार होते. पण, मस्क यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव ही बैठक होऊ शकली नाही. पण मस्क यांनी लवकरच मंत्री गोयल यांना भेटण्याचे आश्वासन दिले आहे. गोयल यांनी टेस्ला कारखान्यातील भारतीय संशोधक आणि अभियंते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

हे ही वाचा :

TESLA New CFO : टेस्ला कंपनीत मोठा बदल! किर्खोर्न यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचा नवा वित्तीय प्रमुख

Back to top button