पुणे : राष्‍ट्रीय कुस्‍ती विजेत्‍या शिवराज राक्षे ची गावात जंगी मिरवणूक | पुढारी

पुणे : राष्‍ट्रीय कुस्‍ती विजेत्‍या शिवराज राक्षे ची गावात जंगी मिरवणूक

भामा आसखेड ; पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राक्षेवाडी गावचा सुपुत्र पै.शिवराज काळूराम राक्षे याने उत्तर प्रदेशात गोंडा अयोध्या येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील खुल्या वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. याबद्दल राक्षेवाडी ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीत गावातून मिरवणूक काढून त्‍याचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

उत्तर प्रदेशात गोंडा अयोध्या येथे नुकत्याच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. खुल्या वजनी गटात (१२५ किलो वजन) पै शिवराज राक्षे याने अंतिम फेरीत हरियाणा राज्याच्या पै मोहित याच्यावर ३–१ ने मात करीत विजय संपादन केला. तसेच अन्य चार कुस्त्याही शिवराजने १०–० या फरकाने सहजपणे जिंकल्या आहेत. स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकल्यानंतर सोमवारी (दि.१५) रात्री ११ वाजता शिवराजचे राक्षेवाडी गावचे प्रवेशद्वार (कमान) शेजारील गणेश मंदिर येथे आगमन झाले.

गणेशाच्या दर्शनानंतर गावातील महिलांनी शिवराजचे औक्षण केले. त्यानंतर गणेश मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करीत शिवराजची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर ग्रामपंचायासमोर पै. शिवराजचा ग्रामस्थांचे वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

बाजार समितीचे संचालक व माजी उपसभापती अशोक राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र राक्षे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, खेड वकीलबार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड अनिल राक्षे, गावचे पोलीस पाटील पप्पूकाका राक्षे, पै.शिवराजची आई व गावच्या सरपंच सुरेखा राक्षे, वडील पै. काळूराम राक्षे, राक्षेवाडी उपसरपंच मच्छिंद्र राक्षे, साकुर्डी उपसरपंच विनायक चौधरी, युवानेते सुरज राक्षे, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबा राक्षे आदींसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पै. शिवराजचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी अभिनंदन करीत पै. शिवराजला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचलं का? 

Back to top button