Kolhapur Legislative Council Election: सतेज पाटील vsअमल महाडिक | पुढारी

Kolhapur Legislative Council Election: सतेज पाटील vsअमल महाडिक

कोल्हापूर; सतीश सरीकर

विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत Kolhapur Legislative Council Election अखेर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपने माजी आमदार अमल महाडीक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत महाडीक यांचे नाव निश्चित करण्यात आले. सतेज पाटील व महाडीक या पारंपारीक विरोधकातच आता विधान परिषदेची काटाजोड लढत होणार आहे. कारण सतेज पाटील यांच्याविरूद्ध भाजप तगडा उमेदवार कोण देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

२०१४ मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना अमल महाडीक यांनी अवघ्या २२ दिवसांत प्रचार करून परावभावाची धूळ चारली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच २०१५ मध्ये सतेज पाटील यांनी अमल यांचे वडिल व तत्कालीन विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडीक यांना पराभवाचा दणका दिला होता. त्यानंतर सतेज पाटील यांची विजयी पताका फडकतच राहीली. आता अमल यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने २०१४ मधील विजयाची पुनरावृत्ती करणार? की सतेज पाटील हे विधान परिषदेचा आपला गड शाबूत राखणार? याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून आपल्याकडे जास्तीत जास्त मते असल्याचे सांगून विजयाचा दावा केला जात आहे. परिणामी निवडणूकीतील रंगत वाढली आहे.

Kolhapur Legislative Council Election : सतेज यांच्याविरुद्ध अखेर महाडीकच…

सतेज पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे. त्याबरोबरच गोकुळसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थावर आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पाटील यांच्या सोबतीला राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत. परिणामी जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरूध्द सर्व अर्थाने सक्षम उमेदवार कोण? याची चाचपणी गेले काही दिवस भाजपकडून सुरू होती. अमल महाडीक यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडीक व आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे यांची नावे आघाडीवर होती. परंतू सतेज यांच्याविरूध्द लढत देण्यासाठी महाडीक हेच पर्याय असू शकतात, असे ग्राह्य धरून भाजपच्या कोअर कमिटीने महादेवराव महाडीक व भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडीक यांच्याशी चर्चा करून अखेर अमल महाडीक यांचे नाव निश्चित केले.

Kolhapur Legislative Council Election :दिल्लीतून दोन दिवसांत घोषणा…

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री पियूश गोयल यांच्या उपस्थितीत भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित होते. यात कोल्हापूर विधान परिषद निवडणूकीसाठी अमल महाडीक यांचे तर धुळे विधान परिषद निवडणूकीसाठी अमरिश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाकडून दोन-तीन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा होईल.

हेही वाचा : 

Back to top button