Shiv Sena- BJP : विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भाजपला पाठिंबा | पुढारी

Shiv Sena- BJP : विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भाजपला पाठिंबा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दिल्लीत पत्रकार परिषद घेत तशी घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.  (Shiv Sena- BJP)
देशात छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापैकी छत्तीसगड विधानसभेचा पहिला टप्प्याचे तर मिझोरम विधानसभेचे मतदान पूर्ण झाले आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भाजपला या निवडणुकांमध्ये पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. (Shiv Sena- BJP)
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना मानणारा शिवसेना पक्ष आहे. शिवसेना-भाजप युतीला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे, त्या राज्यांमधील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभागी होतील आणि भाजपसाठी प्रचार करतील, तसे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे, मुख्य समन्वयक आशिष कुलकर्णी आणि शिवसेना सचिव अभिजीत अडसूळ यांना शिवसेना आणि निवडणूक असलेल्या भाजपच्या प्रदेश संघटनांसोबत समन्वय करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही राहुल शेवाळे यांनी सांगितले.
Shiv Sena- BJP : सावंतांच्या व्हिडिओवर राहुल शेवाळेंचे मौन 
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर बोलताना, मंत्री तानाजी सावंत स्वतः स्पष्टीकरण देतील, माझ्या बघण्यात तो व्हिडिओ आला नाही, त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही, असे म्हणत त्यांनी तानाजी सावंतांच्या कथित व्हायरल व्हिडिओवर बोलणे टाळले.
हेही वाचा 
 

Back to top button