Pune News : पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन | पुढारी

Pune News : पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात नागरिकांनी दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. फटाकेविरहित दिवाळी साजरी करून प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी हा सण अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा असून, दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. हा सण साजरा करताना नागरिकांनी वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यांसारख्या उद्भवणार्‍या समस्यांना आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी सांगितले आहे.

फटाके हे वायुप्रदूषणास कारणीभूत ठरतात. त्यामुळे शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा वापर करू नये. शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालय इत्यादी ठिकाणी फटाके उडवू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. दिवाळीत 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक पर्याय

  •  नागरिकांनी घर सजविण्यासाठी अधिक ऊर्जा, कार्यक्षम प्रकाश देणारे एलईडी दिवे किंवा सौरदिवे वापरावेत.
  • प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेले किल्ले पर्यावरणास घातक ठरतात. त्यांचा वापर न करता दगड, मातीपासून किल्ले बनवावेत.
  • रासायनिक रंग आणि रांगोळी न वापरता नैसर्गिक रांगोळी वापरावी.
  • प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता पर्यावरणपूरक किंवा रिसायकल करता येणार्‍या वस्तूंपासून बनलेले आकाशकंदील वापरून सजावट करावी.

हेही वाचा

Back to top button