Pune News : प्रदूषण रोखण्यासाठी पथके

Pune News : प्रदूषण रोखण्यासाठी पथके
Published on
Updated on
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिल्ली, मुंबई पाठोपाठ पुण्यामध्येही हवेची प्रदूषण पातळी धोकादायक झाल्याने हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषणाबाबत नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी पथके नेमली जाणार आहेत. दिल्लीतील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शाळांना सुटी देण्यासोबतच अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत.
दिवाळी निमित्त होणार्‍या आतषबाजीने प्रदूषणात भर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार राज्य प्रदूषण नियामक मंडळाने सर्वच महापालिकांना हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकांची ऑनलाइन मीटिंग घेऊन प्रदूषण कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी नियमावली केली आहे.
प्रत्येक सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखालील उपअभियंता, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि सहायक निरीक्षकांचा समावेश असलेली पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हवा प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण मंडळ, जनसंपर्क विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने संयुक्तपणे व्यापक उपक्रम हाती घ्यावेत. प्रदूषणाबाबतची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक राहील.

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रमुख सूचना

  • बांधकामाच्या ठिकाणी चोहोबाजूने किमान 25 फूट उंचीचे पत्रे लावणे.
  • बांधकामाभोवती हिरव्या रंगाचे कापड लावणे.
  • बांधकाम पाडताना भोवती हिरव्या ओल्या कापडाचे आच्छादन बांधणे.
  • बांधकामाच्या ठिकाणचे साहित्य भरताणा किंवा उतरताणा पाण्याची फवारणी करणे.
  • राडारोडा, क्रश सँड, सिमेंट वाहतूक करताना त्यावर आच्छादन टाकावे.
  • राडारोडा महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणीच टाकावा.
  • रात्रीच्यावेळी उघड्यावर राडारोडा टाकणा-यांवर कारवाईसाठी प्रशासनाने पथके नेमावीत.
  • बेकरींमध्ये लाकडी भट्ट्यांचे रूपांतर इलेक्ट्रिक अथवा पीएनजी गॅसवर करावे.
  • हवा प्रदूषणाबाबत जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करावेत.

20 चौकांमध्येही  उभारणार कारंजे

शहरातील हवेचे प्रदूषण वाढत असल्याने महापालिका प्रशासाने हवेची गुणवत्ता तपासून 20 अतिरहदारीच्या चौकामध्ये कारंजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे धूळ आणि प्रदूषणाचे कण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news