मुंबई : ग्रा.पं. निवडणुकीत भाजपच नंबर वन | पुढारी

मुंबई : ग्रा.पं. निवडणुकीत भाजपच नंबर वन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. ग्रामीण भागातील जनतेने महायुतीलाच कौल दिला आहे. जाहीर झालेल्या 2 हजार 286 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 399 ग्रामपंचायती भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळाल्या. त्यात सर्वाधिक 724 ग्रामपंचायती जिंकून भाजप नंबर वन ठरला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुसंडी मारत 412 ग्रामपंचायती जिंकल्या; तर 263 ग्रामपंचायती जिंकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तिसर्‍या स्थानी आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीशी संबंधित गटांना 524 ग्रामपंचायती जिंकता आल्या आहेत. त्यात सर्वाधिक 222 ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही या निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. त्यांच्या पक्षाशी संबंधित गटांना 187 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत; तर उद्धव ठाकरे यांच्या ‘उबाठा’ शिवसेनेला केवळ 115 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावता आला आहे.

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींपैकी 2 हजार 286 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. राज्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने काही ठिकाणी एकत्रित, तर काही ठिकाणी विरोधात निवडणूक लढविली होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या ग्रामीण भागातील विविध जिल्ह्यांत ही निवडणूक होत असल्याने त्याबाबत संपूर्ण राज्यभरात उत्सुकता लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून नवा गट स्थापन करणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सामना अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी होता. त्यामुळे महायुतीत सामील झालेल्या अजित पवार यांच्या या निर्णयाला ग्रामीण भागातील जनता कौल देणार का? याबाबत उत्सुकता होती. मात्र, पहिली लढाई अजित पवार यांनी जिंकली असून, बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शरद पवार गटाला धोबीपछाड देत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या गटाला सुमारे 412 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. शिंदे गटाला 263; तर उद्धव ठाकरे गटाला केवळ 115 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. निकालानंतर महायुतीने जल्लोष केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र या निवडणुकीत काँग्रेस पक्ष एक नंबर ठरला असून, महाविकास आघाडीचीच सरशी झाल्याचा दावा केला आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास : तटकरे

स्वराज्याच्या विकासाचा वसा घेऊन सतत काम करणारे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व आणि निर्णयावर राज्यातील जनतेने आज विश्वास व्यक्त केला आहे, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

राज्यभरात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुमारे साडेचारशेहून अधिक ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा त्यांनी केला.

अजित पवार यांनी कायमच विकासाच्या राजकारणाला चालना दिली. प्रत्येक गावात स्थानिक विकासाच्या योजना पोहोचतील, यासाठी अर्थमंत्री म्हणून त्यांचा आग्रह राहिला आहे. अजित पवारांचा विकासाचा शब्द हा प्रत्येक गावात एक विश्वासाचा शब्द म्हणून सन्मानाने स्वीकारला जातो. हाच विश्वास राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने दाखवला आहे, असे तटकरे म्हणाले.

पक्षीय बलाबल
भाजप                                      724
राष्ट्रवादी अजित पवार गट            412
एकनाथ शिंदे गट                       263
काँग्रेस                                     222
राष्ट्रवादी शरद पवार गट             187
शिवसेना उद्धव ठाकरे गट           115

Back to top button