Sangli: करंजेतील ‘त्या’ खटल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करू नका: मुंबई हायकोर्टाचे आदेश | पुढारी

Sangli: करंजेतील 'त्या' खटल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करू नका: मुंबई हायकोर्टाचे आदेश

विटा: पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील करंजे (ता. खानापूर) येथील एका खटल्यात ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात ६ डिसेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करू नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

करंजे येथे भटकी मळा परिसरात ३० जुलै २०२३ रोजी जमिनीच्या वादातून परस्परविरोधी फिर्यादी विटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. यात गावातील सूर्यवंशी मळ्यातील पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपीनाथ सूर्यवंशी आणि त्यांचे वडील भानुदास सूर्यवंशी यांची नावे या गुन्ह्यात ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत नोंदवली आहेत. मात्र, संबंधित घटना घडल्याच्या वेळी गोपीनाथ सूर्यवंशी आणि वडील भीमराव सूर्यवंशी हे दोघेही कोल्हापूरमध्ये होते. तरीही त्यांची नावे राजकीय हेतूने प्रेरीत होऊन दाखल केली आहेत, असा आरोप करत या गुन्ह्यातील नावे रद्द करा, अशी मागणी करणारी आव्हान याचिका २८ सप्टेंबररोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

खानापूर तालुक्यामधील ही अशी पहिलीच याचिका आहे. या खटल्याची १० ऑक्टोबररोजी पहिली सुनावणी झाली. त्यावेळी तपास अधिकारी उपस्थित नव्हते, त्यानंतर परवा ४ नोव्हेंबररोजी झालेल्या सुनावणीच्या वेळीही तपास अधिकारी न्यायालयात हजर राहिले नाहीत. दरम्यान, उच्च न्यायालयाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांना या याचिकेवर ३० नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तो पर्यंत गुन्ह्याचा तपास चालू ठेवला तरी, पुढील ६ डिसेंबरच्या सुनावणीपर्यंत तपास यंत्रणांनी आमच्या पूर्व परवानगीशिवाय याचिकाकर्त्यांवर आरोपपत्र दाखल करू नयेत, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button