SA vs IND : द. आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा, भारताचा वर्ल्डकपमध्ये सलग आठवा विजय | पुढारी

SA vs IND : द. आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा, भारताचा वर्ल्डकपमध्ये सलग आठवा विजय

कोलकाता; वृत्तसंस्था : भारतात सुरु असलेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची वाटचाल स्वप्नवत सुरु असून त्यांनी रविवारी दक्षिण आफ्रिकेवर तब्बल 243 धावांनी विजय मिळवला. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर 65 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने विराट कोहलीने आपला आयकॉन सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांची बरोबरी केली. विराटचे शतक आणि श्रेयस अय्यरचे (77) अर्धशतक याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला 327 धावांचे टार्गेट दिले. विजयासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकायला लावले. स्पर्धेत धावांचा पाउस पाडणार्‍या दक्षिण आफ्रिकेचा त्यांनी 27.1 षटकांत 83 धावांत खुर्दा केला. भारताच्या रवींद्र जडेजाने त्यांच्या 5 विकेटस घेतल्या. भारताचा हा सलग आठवा विजय आहे. या 243 धावांच्या विजयाने भारत आता अनस्टॉपेबल बनला असल्याचा संदेश विरोधकांना मिळाला आहे. (SA vs IND)

भारतीय गोलंदाजांसमोर कोणत्याही फलंदाजाचा निभाव लागणे तसे अवघडच आहे. पण, आफ्रिकेच्या फलंदाजांनी यंदा प्रतिस्पर्धींना चांगला चोप दिला आहे. त्यामुळे चुरस अपेक्षित होती. मोहम्मद सिराजने दुसर्‍याच षटकात क्विंटन डी कॉकला (5) त्रिफळाचीत केले. रवींद्र जडेजाने 9व्या षटकात टेम्बा बवुमाचा (11) त्रिफळा उडवला आणि हेनरिच क्लासेनला (1) पायचीत पकडले. मोहम्मद शमीनेही दोन धक्के दिले. त्याने एडन मार्कराम ( 9) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला (13) बाद करून आफ्रिकेचा निम्मा संघ 40 धावांत तंबूत पाठवले. डेव्हिड मिलर (11) चांगला खेळत होता, परंतु स्वीप मारण्याच्या प्रयत्नात जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला.

जडेजाने अप्रतिम चेंडूवर केशव महाराजचा (7) त्रिफळा उडवला आणि आफ्रिकेला 67 धावांवर सातवा धक्का बसला. कुलदीप यादवने आफ्रिकेची अखेरची आशा असलेल्या मार्को यानसेनला (14) बाद करून आठवा धक्का दिला. भारताने आफ्रिकेचा संपूर्ण संघ 27.1 षटकांत 83 धावांवर माघारी पाठवला आणि 243 धावांनी सामना जिंकला. (SA vs IND) जडेजाने 9-1-33-5 असा स्पेल टाकला. युवराज सिंगनंतर वर्ल्ड कपमध्ये सामन्यात 5 विकेट्स घेणारा जड्डू दुसरा भारतीय फिरकीपटू ठरला.

तत्पूर्वी, रनमशिन विराट, चेसमास्टर विराट, किंग कोहली, बाहुबली कोहली याने आपल्या 35 व्या वाढदिनी ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर 49 वे शतक झळकावले. आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार्‍या बर्थडे बॉय विराटनेही फॅन्सना रिटर्न गिफ्ट दिले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करणार्‍या या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 बाद 326 धावा केल्या. विराट 101 धावांवर नाबाद राहिला. श्रेयस अय्यरने 77 तर रवींद्र जडेजाने नाबाद 29 धावा केल्या.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या आठव्या विजयाच्या शोधात असलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने कोलकाताच्या ईडन गार्डनवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी स्फोटक सुरुवात केली, पण भारतीय कर्णधार रोहित शर्मा (40) बाद होताच धावगतीला ब्रेक लागला. सावध खेळी करत असलेल्या शुभमन गिल (23) ला केशव महाराजने आपल्या जाळ्यात फसवले.

पण, त्यानंतर सुरू झाला तो ‘द विराट शो’. त्याने श्रेयस अय्यरसोबत डाव पुढे नेला. केशव महाराज आणि तबरेज शम्सी यांचा स्पेल खेळून काढल्यानंतर श्रेयसने आपले हात सैल सोडले. विराट विकेट टिकवून खेळत होता, तर श्रेयस धोका पत्करून फटकेबाजी करीत होता. त्यामुळे आटलेला धावांचा ओघ पुन्हा सुरू झाला. अय्यरने 87 चेंडूंत 77 धावांची अप्रतिम खेळी करून भारताची धावसंख्या 300 पार पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, पण लुंगी एन्गिडीने त्याला बाद केले अन् भारताला तिसरा झटका बसला. त्यानंतर लोकेश राहुल (8) आणि सूर्यकुमार यादव (22) यांनी विराटला साथ देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही.

पण दुसर्‍या बाजूला किंग कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करत वन डे मध्ये 49 शतके झळकावण्याचा भीमपराक्रम केला. विराटने सावध खेळी करत शतकाला गवसणी घातली. त्याने 10 चौकारांच्या मदतीने 120 चेंडूंत शतक ठोकून तमाम भारतीयांना वाढदिवशी भेट दिली. अखेरच्या काही षटकांत रवींद्र जडेजाने 15 चेंडूंत 29 धावांची चांगली खेळी करून शतकवीर कोहलीला साथ दिली.

हेही वाचा :

Back to top button