Sunil Tatkare: अजित पवारांची २००४ मध्ये संधी असतानाही मुख्यमंत्रीपदाची संधी कुणामुळे हुकली? : सुनील तटकरे | पुढारी

Sunil Tatkare: अजित पवारांची २००४ मध्ये संधी असतानाही मुख्यमंत्रीपदाची संधी कुणामुळे हुकली? : सुनील तटकरे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे बोलताना माझा उल्लेख केवळ तो व्यक्ती असा का करतात माहित नाही. परंतु, मी क्षुद्र असल्याने कदाचित त्या माझे नाव घेत नसतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ‘वार्तालाप’ कार्यक्रमात लगावला. यानंतर त्यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. (Sunil Tatkare)

तटकरे म्हणाले की, अजित पवार यांना २००४ मध्ये संधी असतानाही मुख्यमंत्रीपदाची संधी कुणामुळे गेली? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केला. आम्ही सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे जनतेने स्वागत केले. शरद पवारांकडे परत जाण्‍याचा आता प्रश्नच नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पुढील लोकसभा निवडणुकीत एनडीएचे ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमुद केले. जागांबाबत भाजप नेते व आम्ही मिळून चर्चा करू, असेही ते म्हणाले. (Sunil Tatkare)

दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले गेले पाहिजे. महायुतीचे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. पुढील निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच कळेल, मराठा आरक्षण देण्याची कुणाची भूमिका योग्य होती. कायम टिकणारे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पुढील निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वाखाली लढवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sunil Tatkare: उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट

तटकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर नागपुरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या काही भावना होत्या. त्या फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button