Pune News : मराठी रंगभूमी दिन विशेष : मराठी नाटकांचा झेंडा सातासमुद्रापार | पुढारी

Pune News : मराठी रंगभूमी दिन विशेष : मराठी नाटकांचा झेंडा सातासमुद्रापार

सुवर्णा चव्हाण

पुणे : आता मराठी व्यावसायिक नाटके फक्त  महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नसून, कोरोना साथीनंतर मराठी व्यावसायिक नाटकांचा झेंडा पुन्हा एकदा सातासमुद्रापार रोवला जात आहे. कोरोनामुळे आलेली मरगळ झटकत पुन्हा एकदा नव्या उर्जेने मराठी रंगभूमी पूर्वपदावर आली असून, मराठी व्यावसायिक नाटकांचे प्रयोग आता पूर्वीप्रमाणेच परदेशातही होऊ लागले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, न्यूझीलंड, इंग्लंड…अशा विविध देशांमध्ये नाटकांचे प्रयोग होत असून, परदेशातील नाट्यरसिकांकडून प्रयोगांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. नाट्यनिर्माते परदेशात नाटक सादर करण्यासाठी पुढाकार घेत असताना अनेक नामवंत सेलिबि—टी पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळाले आहेत.

नामवंत सेलिबि—टी वळले रंगभूमीकडे…

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वर्षा उसगावकर, रोहिणी हट्टंगडी, निर्मिती सावंत, मुक्ता बर्वे…असे नामवंत सेलिबि—टीही रंगभूमीकडे वळले आहेत. त्यांच्या नाट्य प्रयोगांना रसिकांचीही भरभरुन दाद मिळत आहे. नाटकाचा पडदा हा आता त्यांना खुनावत असून, चित्रपट, मालिकांच्या पलीकडे नाटकांमध्ये सेलिबि—टींचा सहभाग आहे.
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकताच त्यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा अमेरिकेतील दौरा पूर्ण केला तर नाट्य निर्मात्या भाग्यश्री देसाई या अमेरिकेत त्यांच्या नवीन अमेरिकन अल्बम नाटकाचा प्रयोग करण्याचे नियोजन करीत आहेत. एका लग्नाची पुढची गोष्ट, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, खरं खरं सांग, चारचौघी अशा विविध नाटकांचे दौरे परदेशात होत आहेत. रविवारी (दि.5) साजरा होणार्‍या मराठी रंगभूमी दिनानिमित्त दै. पुढारीने मराठी नाटकांच्या परदेशातील दौर्‍यांबद्दल जाणून घेतले.  देसाई म्हणाल्या, महाराष्ट्रात नाटकांचे दौरे होत आहेत. मागील वर्षीपासून विविध देशांमध्येही नाटकांचे प्रयोग होत असून,  निर्माते आता परदेशांतील दौरेही करत आहेत.
नुकत्याच अमेरिकेत झालेल्या नाट्य प्रयोगाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. अमेरिका, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेले मराठी भाषक हे नाटकांचे चाहते आहेत. त्यांच्यासाठी नाट्य प्रयोग हे एका दिवाळीप्रमाणेच असते. त्यामुळे परदेशात दौरा करताना खूप आनंद होतो.
– प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते
विविध देशांमध्ये महाराष्ट्रीय मंडळे, नाट्य संस्था, नाट्य व्यवस्थापक नाट्य प्रयोगांसाठीचे दुवे असून, त्यांच्या सहकार्याने विविध देशांमध्ये नाट्य प्रयोग होत आहेत. नाट्य निर्मात्यांना याचा आर्थिक फायदाही होत असून, अमेरिकेमध्ये सर्वाधिक प्रयोग होत आहेत.
– सत्यजित धांडेकर, नाट्य व्यवस्थापक
हेही वाचा

Back to top button