पिंपळवंडी येथे चुरशीची लढत; मतदानासाठी दोन्ही पॅनलकडून प्रयत्न | पुढारी

पिंपळवंडी येथे चुरशीची लढत; मतदानासाठी दोन्ही पॅनलकडून प्रयत्न

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी हे मोठं गाव. या गावांमध्ये आज १७ सदस्य आणि सरपंच अशा एकूण १८ जागांसाठी मतदान होत आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या विचाराचा एक पॅनल तर दुसरे पॅनेल रघुनाथ लेंडे, शरद लेंडे, महादेव वाघ यांच्या विचारांचे आहे. या दोन पॅनलमध्ये जोरदार सामना पाहायला मिळतोय. विजय कोण होणार याबाबतचं सांगणं आज जरी अवघड असलं तरी दोन्ही गटांमध्ये लढत चुरशीची होतेय.

माजी आमदार शरद सोनवणे यांनी चांगल्या प्रकारे या निवडणुकीमध्ये वातावरण निर्माण केला आहे. दुसरीकडे रघुनाथ लेंडे यांनी आपल्या भावजाईला या निवडणुकीच्या रिंगणात उतरून सरपंचपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल, असा दावा केला आहे. पिंपळवंडी गावच्या मतदारांची संख्या सुमारे १७ हजार ५०० असून मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील असा दावा दोन्ही गटाकडून केला जात असून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा प्रयत्न दोन्ही गटाचा दिसतोय.

माजी आमदार शरद सोनवणे, मंगेश काकडे, शिवाजी काकडे ही मंडळी एकत्र आली तर दुसरीकडे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पिंपळवंडी सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथ लेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, माजी सरपंच महादेव वाघ हे एकत्र आलेले आहेत. निवडणुकीमध्ये जोरदार चुरस असून विजय आमचाच होणार असा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे.

दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहॆ. मतदार अतिशय शिस्तीमध्ये रांग लावून मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.

Back to top button