Pune University : पुणे विद्यापीठातील राड्यामुळे आता प्रवेशावर बंधने..! बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश | पुढारी

Pune University : पुणे विद्यापीठातील राड्यामुळे आता प्रवेशावर बंधने..! बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेली हाणामारी, वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा प्रकार, त्यानंतर पुन्हा राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये राडा, अशा घटनांमुळे विद्यापीठात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने तातडीने सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली असून, विद्यापीठाच्या आवारातील प्रवेशावर बंधने आणली असून, विद्यापीठात बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल प्रवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांमध्ये बुधवारी (दि. 1) हाणामारी झाली, त्यानंतर गुरुवारी विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार अभाविपने केली. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आंदोलन केल्यानंतर त्यांची स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांशी वादावादी झाली.

या घटनांमुळे गेल्या तीन दिवसांपासून विद्यापीठ चर्चेत आले आहे, तसेच विद्यापीठातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच काही व्यक्ती हा मजकूर समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करून, प्रसिद्धी देऊन या कृत्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व संबंधितांविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध करीत आहे. विद्यापीठाचे पावित्र्य जपणे समाजाच्या सर्व घटकांची नैतिक जबाबदारी आहे.

विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित करणार्‍या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला. तसेच, विद्यापीठात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाची सुरक्षा वाढविण्यात येत आहे. सर्व प्रवेशद्वारांवर आवश्यक बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौकशी आणि नोंदणी करून प्रवेश देण्यात येईल तसेच सर्व वसतिगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवासी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

ग्रामीण विद्यार्थ्यांना हक्काची प्लेसमेंट

कमी वयातच मणक्याच्या तक्रारी? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Pune News : पालिकेकडून 13 हॉटेलच्या अनधिकृत शेडवर कारवाई

Back to top button