कमी वयातच मणक्याच्या तक्रारी? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय | पुढारी

कमी वयातच मणक्याच्या तक्रारी? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

डॉ. महेश बरामदे

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच वाढत्या वयाचा परिणाम पाठीच्या मणक्यावर देखील होत असतो. पण, कमी वयातच मणक्याच्या तक्रारी सुरू झाल्या, तर आपली जीवनशैली सुधारण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या 

पाठीच्या मणक्यांच्या दोन हाडांमध्ये गोल गादीसारखी डिस्क असते. या डिस्कच्यामध्ये मुलायम, तरल, घट पदार्थ असतो त्याला न्युक्लियस म्हणतात. वयाच्या दहाव्या वर्षानंतर डिस्कमधील तरल पदार्थ कमी होऊ लागतो त्याला ‘डिस्क डिहायड्रेशन’ म्हणतात. मधुमेह, धूम्रपान अधिक जड वस्तू उचलणे, वारंवार वाकून काम करणे, संगणकावर दीर्घकाळ काम करणे, आनुवंशिकता या कारणांमुळे मणक्यावर वेगाणे परिणाम दिसून येतो.

मणक्याचे स्वास्थ बिघडल्याची लक्षणे

कंबर आणि पाठ दुखणे, कंबर मान यामध्ये आखडलेपण येणे, पायात वेदना होणे आणि चालताना त्रास होणे, पाय आणि हाताला मुंग्या येणे, बधीरता येणे, पाय आणि हातामध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना अनियमितता जाणवणे, वारंवार शरीर अशक्त झाल्यासारखे वाटणे, लिहिताना त्रास जाणवणे, पाठीची स्थिती बदलणे, मणक्यांमध्ये वेदना होणे यांसारखी लक्षणे दिसत असल्यास पाठीच्या मणक्याचे स्वास्थ बिघडले आहे, असे समजावे.

मणक्याचे स्वास्थ्य राखण्यासाठी

चुकीच्या पद्धतीने कुठलीही वस्तू उचलणे, तीव्र वेदना होण्याचे कारण बनू शकते. यामुळे डिस्क दुखावू शकते मणक्यामध्ये फ्रॅक्चरची शक्यता वाढते. याबरोबरच उठण्या-बसण्याची पद्धत देखील योग्य असणे गरजेचे असते. क्षमतेपेक्षा जास्त सामान उचलणे आणि पाठ वाकवून चालणे यामुळे मणक्यावर दबाव पडतो.

पूर्ण झोप घ्यावी

झोपताना मणक्याला आराम मिळेल असे झोपावे. एकाच स्थितीत झोपू नये. पाठीवर झोपणे हे पाठ आणि कंबर यांच्या स्नायूंना आराम देते. पाठीवर झोपणे हे मणक्याच्या हाडांची सामान्य स्थिती राखण्यासाठीही उपयोगाचे असते; तर एका कुशीवर झोपल्यामुळे मणक्याला आधार देणारे लिगामेंट्स आणि पोटाच्या खालच्या भागातील स्नायूंना आराम मिळतो. पोटावर झोपल्यामुळे पोटाच्या स्नायूंना फायदा होतो. त्यामुळे झोपताना अर्धा वेळ पाठीवर झोपावे, 20 टक्के उजव्या आणि डाव्या कुशीवर झोपावे आणि उरलेल्या वेळेत पोटावर झोपावे.

पोटाच्या घेरावर नियंत्रण राखावे

मणक्याचे आरोग्य बर्‍याच प्रमाणात पोटाच्या स्नायूंवर अवलंबून असते. पोटावर अधिक चरबी साठली, तर स्नायू ताणले जातात आणि ते कमकुवत बनतात. यामुळे मणक्याचे जोड कमकुवत होतात. त्यामुळे मणक्याचे स्वास्थ्य बिघडते. पोटावर चरबी असल्यास शरीराचा भाग पुढच्या दिशेने झुकतो. यामुळे पाठीवर आणि कंबरेवर दाब वाढतो.

धूम्रपान न करणे

हाडांचे आणि स्नायूंचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीरात ऑक्सिजनची पातळी योग्य राखणे गरजेचे असते. धूम्रपान केल्याने निकोटिन फुफ्फुसाद्वारे आत जाते. निकोटिन रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते. यामुळे मणक्याच्या जोडामधील डिस्कवर परिणाम होतो. यामुळे डिस्कच्या प्रोटिन संरचनेवरही परिणाम होतो.

योग्य आहार

प्रोटिन आणि कॅल्शियम भरपूर असलेला आहार ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव करतो. यामुळे मणका मजबूत बनतो. परिणामी, मणक्याच्या आकारात बदल आणि फ्रॅक्चरची जोखीम कमी होते. हाडांच्या आरोग्यासाठी ड जीवनसत्त्व आवश्यक असते. ते सूर्यकिरणांमधून मिळते, म्हणून रोज काही वेळ कोवळ्या सूर्य किरणात घालवावा. भरपूर पाणी प्यावे, यामुळे मणक्याच्या सांध्यांमधील मुलायम टिश्यू आणि पेशींमधील लवचिकपणा कायम राहतो.

पर्यायी उपचार

अ‍ॅक्युपंक्चर आणि योगासने मणक्याचा आकार योग्य राखण्यास उपयुक्त ठरतात. खास करून भुजंगासन, शलभासन, पश्चिमोत्तानासन नियमितपणे केल्यास मणक्याच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. पाठदुखीचा त्रास वारंवार झाल्यास चांगल्या तज्ज्ञांना दाखवावे. फिजिओथेरपीद्वारे मणक्याचे आरोग्य वेळीच चांगले राखण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.

Back to top button