ग्रामीण विद्यार्थ्यांना हक्काची प्लेसमेंट | पुढारी

ग्रामीण विद्यार्थ्यांना हक्काची प्लेसमेंट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) स्वतंत्र प्लेसमेंट संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर सरकारी, खासगी अशा 4 हजारांहून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली असून, कंपन्यांतील नोकर्‍यांची विद्यार्थ्यांना घरबसल्या माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता हक्काची प्लेसमेंट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतल्याची माहिती एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी जूनमध्ये पुण्यात दिली होती. या पार्श्वभूमीवर एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन यांनी या संकेतस्थळाचे अनावरण केले. हे संकेतस्थळ आता एआयसीटीईच्या इंटर्नशिप संकेतस्थळाशीही जोडण्यात येणार आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. डॉ. सीतारामन म्हणाले की, या संकेतस्थळाद्वारे ग्रामीण आणि आदिवासी भागातील अभियांत्रिकीसह अन्य तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी भटकावे लागणार नाही. या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थी थेट हजारो बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडले जातील. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर त्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित नोकरीचे हजारो पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे कंपन्यांना देशभरातील उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांतील उत्तम मनुष्यबळाचा शोध घेण्याचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

करिअर समुपदेशनही…

विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी अनुकूल अशा पद्धतीने संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान इंटरनेटची गरज भासणार नाही. नोकरी मिळण्यासह करिअर समुपदेशन, मुलाखतीसाठी मार्गदर्शन, अशा सुविधाही संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

कमी वयातच मणक्याच्या तक्रारी? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

शेतकर्‍यांना एक रुपयात रब्बी पीकविम्याचा लाभ

पुणे जिल्ह्यातील 37 ग्रा.पं.बिनविरोध

Back to top button