पावडर, बटरचे दर घटल्याने दूध खरेदीचे दर उतरले | पुढारी

पावडर, बटरचे दर घटल्याने दूध खरेदीचे दर उतरले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात दूध पावडर आणि बटरचे दर घटल्यामुळे गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटरला दोन ते तीन रुपयांनी कपात करण्यात येऊन दर 29 ते 30 रुपयांपर्यंत खाली आल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर दूध उत्पादक शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे. 1 नोव्हेंबरपासून दरातील घसरणीची अंमलबजावणी सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांनी संयुक्तपणे सुरू केली केली आहे.

राज्यात दुधाची आवक नियमितपणे होत असून, पावडर व बटरच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम हा गाईच्या दुधाचे खरेदी दर कमी होण्यावर झाला आहे. दूध पावडरचा प्रतिकिलोचा दर 250 वरून 210 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर बटरचा दरही 360 ते 370 वरून 320 रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजे सरासरी पावडर व बटरचे दर किलोमागे 40 ते 50 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे पावडर उत्पादकांनी दूध खरेदीचे दर कमी केले आहेत. त्याचा एकत्रित परिणाम दूध खरेदी दर घटण्यावर झाला आहे.

जागतिक बाजारातही दूध पावडर व बटरच्या दरात मंदीची स्थिती आहे. त्याचाही परिणाम स्थानिक बाजारावर झालेला आहे. शिवाय आगामी दिवाळी सणासाठी तुपाला राहणारी मागणीही कमीच आहे. तसेच दुग्धजन्य उपपदार्थांनाही सणाची वाढणारी मागणी सध्या दिसून येत आहे. अन्य बाजारपेठांवरील मंदीचे सावट दुग्ध व्यवसायावरही घोंगावत आल्याचा परिणाम म्हणून गाईच्या दुधाचे खरेदी दर सध्या कमी झाले आहेत. दरम्यान, मागणी वाढल्याशिवाय ही स्थिती बदलणार नसल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी दीपावली सणाचा गोडवा कडूच झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.

हेही वाचा

कोल्हापूर : मनपाच्या घरफाळा विभागाचे दोन लिपिक लाच घेताना जेरबंद

Pimpri News : नियमबाह्य होर्डिंगवर पडणार हातोडा 

सरसकट आरक्षणासाठी आणखी थोडा वेळ थांबू : मनोज जरांगे पाटील

Back to top button