Pimpri News : नियमबाह्य होर्डिंगवर पडणार हातोडा  | पुढारी

Pimpri News : नियमबाह्य होर्डिंगवर पडणार हातोडा 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने बाह्य जाहिरात धोरणात पुन्हा बदल केले आहेत. राज्य शासनाच्या 9 मे 2022 च्या अधिसूचनेनुसार महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभाग कार्यवाही करीत आहे. नियमात नसलेले जाहिरात होर्डिंग अनधिकृत समजून तोडण्यात येणार असून, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई मोहीम विभागाने हाती घेतली आहे.

संपूर्ण विभागाची केली पुनर्रचना

वतीने गेल्या पाच वर्षांत दोन वेळा बाह्यजाहिरात धोरण तयार करण्यात आले. त्यांची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली. मात्र, 2022 मधील राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नवे धोरण स्वीकारण्यात आले. महापालिकेचे पूर्वीचे धोरण रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, किवळे येथे जाहिरात होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तर, 3 जण जखमी झाले. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, संपूर्ण विभागाची पुनर्रचना
करण्यात आली.
महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात पिंपरी-चिंचवड आउटडोअर असोसिएशनने दावा दाखल केला होता. न्यायालयाने नियमानुसार असलेल्या जाहिरात होर्डिंगला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, त्या होर्डिंगचालकांकडून 31 मार्च 2023 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह परवाना शुल्क भरून घेण्यात आले आहे. कागदपत्रे योग्य असलेल्या होर्डिंगना परवानगी दिली जाणार आहे. अन्यथा ती अनधिकृत समजून तोडली जाणार आहेत.

अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार

सन 2023-24 या वर्षांत नूतनीकरणासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे. मंजुरीसाठी केलेल्या अर्जात जाहिरात होर्डिंगचा आकार 40 फूट बाय 20 फूट आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक आकाराचे होर्डिंग लागले आहेत. हे होर्डिंग तसेच जमिनीपासून 10 फुटांपेक्षा कमी उंचीवरील होर्डिंग, नियमानुसार होर्डिंगवर पाटी, क्यूआर कोड नसल्यास, लोखंडी होर्डिंग जमिनीखाली व वर गंजलेले किंवा सडलेले असल्यास त्या होर्डिंगना परवानगी न देता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
अशा होर्डिंगना परवानगी घेताना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. शहरात नव्याने होर्डिंग लावले जात आहे. नियमानुसार होर्डिंग न उभारल्यास त्याला महापालिका परवानगी देणार नाही. तसेच, परवानगी रद्द करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र न दिल्यास महापालिका त्या होर्डिंगवर कारवाई करणार आहे.

शहर सुंदर दिसावे यासाठी पालिकेचे प्रयत्न

पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीत रूपांतर होत आहे. जाहिरात होर्डिंग जास्तीत जास्त सुखावह असावा. त्याचा आकार एकसमान असावा. नागरिकांना दृश्य प्रदूषणाला सामोरे जाऊ नये. नागरिकांच्या रस्ता वाहतूक सुरक्षा हमी व शहर सौदर्य अबाधित राखणे आवश्यक आहे. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून नियमितपणे सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे, असे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.
फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार 
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राप्त अर्ज, नूतनीकरणासाठी आलेले अर्ज, नव्याने मंजुरी द्यावयाचे जाहिरात होर्डिंगबाबत तसेच, हस्तांतरणाबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने नवीन नियमानुसार कार्यवाही सुरू केली. शहरात जाहिरात होर्डिंगमालक व चालकांनी शपथपत्र देणे बंधनकारक केले आहे. नियमाचे पालन न करणार्‍या होर्डिंगचालक व मालकांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 नियम 3 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
हेही वाचा

Back to top button