Rice | कोकणात भाताचे उत्पादन घटणार; रुसलेल्या पावसाचा परिणाम | पुढारी

Rice | कोकणात भाताचे उत्पादन घटणार; रुसलेल्या पावसाचा परिणाम

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : यंदा एल निनो वर्ष असल्याने पावसाचा लहरीपणा, पावसातील खंड, असमान वितरण आणि सुरुवातीपासून रुसलेला पाऊस यामुळे यदा खरिपातील भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या मध्यापासून आतापर्यंत कोकण किनारपट्टी भागात दमदार पाऊस झाला असला तरी त्यात सातत्य नव्हते. जून आणि ऑगस्ट है। खरिपाचे महत्वाचे महिने तर कोरडेच गेले. या सर्वांच्या परिणामाने यंदा खरिपात उत्पादन किमान २० ते १५ टक्के घटण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीला बसणार आहे. भाताचे उत्पादन यंदा २० टक्के घटण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाची अनियमितता आणि पाण्याअभावी भातरोपांना अधिकचे फुटवे आलेले नाहीत. काही ठिकाणी रोपांची उंचीच वाढलेली नाही. कातळावरील रोपे पिवळी पडल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने ही भात शेती काहीप्रमाणआत तारुन नेली. ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठच फिरवली. त्या नंतर कडकडीत उन्हाने भातशेती जणू करपत होती.

जिल्ह्यात १ जून ते ७ सप्टेंबर या कालावधीत सरासरी २५८२ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कलावधीत २९७१ मि.मी. पाऊस झाला होता. तुलनेत ४०० मि.मी. कमी पाऊस झाला असून, सरासरीपेक्षा कमी नोंद आहे. अनियमित पावसामुळे पुरेसे पाणी भातरोपांना मिळाले नाही. त्यामुळे रोपांची वाढ झाली नाही.

यंदा जून महिन्यांच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. त्या नंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी भातलावण्यांची कामे पूर्ण केली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने लावण्या झालेल्या भात खाचरांची स्थिती चिंताजनक होती. कातळावरील भातरोपे पिवळी पडली.

रत्नागिरी जिल्ह्यात ६१ हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक भाताचे क्षेत्र आहे. पालघर जिल्ह्यात कोकणातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पाऊस झाला. मात्र, उर्वरित जिल्ह्यात तुटीच्या पवासची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यातही जेमतेम सरासरी इतका पाऊस झाला. पावसाच्या नियमितेचा फटका येथील ५ ते १० टक्के हेक्टर क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. येथील उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला. मात्र, मोक्याच्या वेळी पावसाने पाठ दाखविल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भात शेती बरोबरच नाचणी पीकाची उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती आहे.

जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अधिक असलेल्या क्षेत्रातील भातशेती चांगली झाली आहे. मात्र, कातळावरील, किंवा पाण्याचा अभाव असेलली रेताड जमिनीतील भातशेती अडचणीत सापडली. काही भागात पावसा अभावी आणि वाढलेल्या तापमानाने शेते पिवळी पडली. रोपांचे शेडे करपून गेले. फुटवा कमी आल्यामुळे यंदा जिल्ह्याचे भात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादकतेवरही परिणाम होण्याची भीती आहे. भाताची हेक्टरी उत्पादकता ३२ क्विंटल आहे. ती कमी होण्याची भीती आहे.
– सुनंदा कुन्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

हेही वाचा : 

Back to top button