राज्यात यंदा 84 लाख टनांनी ऊस उत्पादन घटण्याचा अंदाज | पुढारी

राज्यात यंदा 84 लाख टनांनी ऊस उत्पादन घटण्याचा अंदाज

किशोर बरकाले

पुणे : राज्यात चालू वर्ष 2023-24 मध्ये गतवर्षाच्या तुलनेत सुमारे 83 लाख 91 हजार टनांनी ऊस गाळप कमी होण्याचा साखर आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार प्रत्यक्षात 970 लाख टन ऊस गाळपातून इथेनॉलकडे जाणारी 15 लाख टन साखर वगळून सुमारे 94 लाख टनांइतके साखरेचे उत्पादन हाती येणार आहे. म्हणजेच साखरेचे गतवर्ष 2022-23 मध्ये 105 लाख 31 हजार टन झालेले उत्पादन पाहता यंदा सुमारे 12 लाख टनांनी साखर उत्पादन कमी होईल, अशी माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.

साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक कारखानानिहाय उपलब्ध राहणार्‍या उसाचा आढावा घेण्यात आला आणि कृषी विभागाचीही उपलब्ध माहिती विचारात घेऊन आगामी गाळप हंगाम 2023-24 मध्ये प्राथमिक अंदाजानुसार 14 लाख 37 हजार हेक्टरवर गाळपासाठी ऊस उभा आहे. त्यामध्ये प्रति हेक्टरी 75 टनांप्रमाणे सरासरी उत्पादकता गृहीत धरता एकूण अंदाजित ऊस उपलब्धता 1 हजार 78 लाख टन राहील. तर त्यापैकी 90 टक्के ऊस गाळपास येईल, असे ग्राह्य धरुन प्रत्यक्षात चालू वर्षी 970 लाख टनाइतके ऊस गाळप होण्याचा अंदाज आहे. सरासरी साखर उतारा 11.25 टक्के गृहीत धरुन 109 लाख टनांइतके साखर उत्पादन तयार होईल.

इथेनॉल निर्मिती आणि त्याकडे सुमारे 15 लाख टन साखर वळविली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे उत्पादित साखरेतून इथेनॉलकडे जाणारी साखर वजा जाता आणि संभाव्य निव्वळ साखर उतारा 10 टक्क्यांप्रमाणे धरता राज्यात प्रत्यक्षात साखरेचे 94 लाख टनाइतके उत्पादन हाती येण्याचा अंदाज आहे. सुमारे 11 लाख 91 हजार टनांनी साखरेचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता साखर आयुक्तालयाने व्यक्त केली.

ऊस गाळपाची मागील 5 वर्षांची स्थिती

हंगाम……………क्षेत्र लाख हेक्टर… गाळप लाख टन…. साखर उत्पादन लाख क्विंटल……उतारा-टक्के
2022-23……..14.87…………1053.91……………1053.17……………………..11.28
2021-22……..14.88…………1322.05……………1373.60……………………..11.26
2020-21……..11.42…………1014………………..1064…………………………11.24
2019-20……..8.22…………..545.26……………..616.12………………………11.30
2018-19……..11.62…………952.11……………..1072………………………….11.26

राज्यात पावसाने दिलेली ओढ आणि अनियमिततेचा फटका ऊस पिकास बसला आहे. खोडवा उसाचे प्रमाणही जास्त राहिले. साखर कारखाने, कृषी विभागाच्या आढाव्यातून प्राप्त माहितीनुसार चालू वर्षी प्रत्यक्षात 970 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

– डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, साखर आयुक्त, पुणे.

हेही वाचा

महागाई नियंत्रणाची केंद्राची कसरत आणखी कठीण!

नागपूर : रांचीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशाचा मृत्यू

नागपूर : बेपत्ता महिलेचा मृतदेह नदीत सापडल्याने खळबळ

Back to top button