पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मान्सूनच्या पावसाने उशिराने हजेरी लावल्याचा फटका हा मूग आणि उडदाच्या पेरणीला बसला आहे. खरीप हंगामात मुगाची 42 टक्के, तर उडदाची 62 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली असून, या दोन्ही कडधान्यांच्या उत्पादनात घट येण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. मान्सूनच्या पावसाने जून महिन्यात हजेरी लावली नाही आणि पेरणीचा बहुतांश हंगाम वाया गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. तुरीचा पेराही 83 टक्क्यांइतकाच झाला असून, एकूणच कडधान्यांचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे सांगण्यात आले. राज्यातील मुगाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 93 हजार 957 हेक्टर असून, त्यापैकी 42 टक्के म्हणजे 1 लाख 64 हजार 774 हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे.
प्रमुख जिल्हानिहाय मुगाची झालेली पेरणी हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : नाशिक 16 हजार 956, धुळे 4 हजार 7, नंदुरबार 1 हजार 735, जळगाव 13 हजार 607, अहमदनगर 20 हजार 11, पुणे 4 हजार 741, सोलापूर 9 हजार 918, सातारा 7 हजार 5, औरंगाबाद 7 हजार 718, जालना 13 हजार 5, बीड 8 हजार 905, लातूर 4 हजार 393, धाराशिव 5 हजार 261, नांदेड 13 हजार 398, परभणी 7 हजार 195, हिंगोली 4 हजार 337, बुलडाणा 7 हजार 346 हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे.
राज्यातील उडदाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 70 हजार 252 हेक्टर असून, त्यापैकी 62 टक्के म्हणजे 2 लाख 28 हजार 919 हेक्टरवरील पेरणी पूर्ण होऊ शकली. तुरीचे सरासरी क्षेत्र 12 लाख 95 हजार 516 हेक्टर असून, प्रत्यक्षात 83 टक्के म्हणजे 10 लाख 80 हजार 709 हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. तर इतर कडधान्ये पिकांखालील सरासरी क्षेत्र (कुळीथ, चवळी, मटकी, राजमा व इतर) 78 हजार 845 हेक्टर असून, प्रत्यक्षात 68 टक्के म्हणजे 53 हजार 996 हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक डी. बी. पाटील यांनी दिली.
'मान्सूनपूर्व पावसाची नसलेली हजेरी आणि जून महिन्यातही पुरेसा पाऊस न झाल्यामुळे मूग आणि उडदाच्या पेरणीस विलंब झाला. योग्य वेळी आणि पेरणीच्या हंगाम कालावधीत पाऊस न झाल्यामुळे मूग आणि उडदाची पेरणी सरासरी क्षेत्राएवढीसुध्दा झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही कडधान्यांचे उत्पादन चालूवर्षी घटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
– दिलीप झेंडे, कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक, कृषी आयुक्तालय
हेही वाचा :