साखर उत्पादनापुढील समस्या! | पुढारी

साखर उत्पादनापुढील समस्या!

विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक

जगभरात वातावरण बदलाचे परिणाम आता चांगलेच जाणवू लागले आहेत. किंबहुना त्याचे चटके सर्व जगाला बसू लागलेले आहेत. वास्तविक, गेल्या 30 वर्षांपासून हवामानतज्ज्ञ आणि याविषयीचे अभ्यासक जगभरातून इशारा देत होते की, याचे परिणाम भविष्यात खूप गंभीर होतील आणि ते आता मोठ्या प्रमाणात दिसू लागलेले आहेत. योगायोगाने याचा परिणाम साखर उद्योगावरही होताना दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, भारत नव्हे, तर जगभरामध्येही साखरेचे उत्पादन हे कमी-अधिक होत असून त्यामुळे जागतिक तसेच देशपातळीवर साखरेचे दर किंवा साखरेचा बाजार हा तेजीतच आहे, असे दिसते.

गळीत हंगाम 2022-23 मध्ये महाराष्ट्रात 127 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज होता. तथापि, गतवर्षीही पावसाने गरजेच्या वेळी हुलकावणी दिल्यामुळे त्याचा परिणाम ऊस पिकावर होऊन हा अंदाज चुकीचा ठरला. गतवर्षी महाराष्ट्रामध्ये 1 हजार 52 टन ऊस गाळला गेला आणि त्यापासून 105.31 लाख टन इतकी साखर तयार झाली. महाराष्ट्रातील गळीत हंगाम सरासरी 121 दिवस इतका कमी चालला. वास्तविक गळीत हंगाम हा किमान 150 ते 160 दिवस चालला, तरच कारखान्याचे अर्थकारण ठीक राहू शकते; परंतु ऊस उत्पादन कमी झाल्यामुळे सर्वच कारखान्यांचे गळीत हंगाम कमी झालेले आहेत. महाराष्ट्राबरोबर देश पातळीवरही या वर्षी जो प्राथमिक अंदाज होता, तो 350 लाख टन साखर उत्पादित होईल असा होता; परंतु तोही कमी कमी होत अंतिमतः गतवर्षी देशपातळीवर 327 लाख टन इतका झाला. याच जोडीला आपण जागतिक साखर उत्पादनाचा विचार केला, तर गतवर्षी 1770 लाख टन एवढी साखर तयार झाली.

ब्राझील, भारत, थायलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांत बहुतांश उसापासून साखर तयार होते. अन्य देशांत विशेषतः क्युबा, युरोपमधील सर्व देश, काही प्रमाणात अमेरिकेत बीटपासून साखर तयार होते. अमेरिकेत उसापासूनही साखर तयार होते. जगामध्ये तयार झालेल्या साखरेमधून निर्यातीसाठी साधारण 650-655 लाख टन इतकी साखर उपलब्ध व्हावी लागते. गतवर्षी ती 653 लाख टन इतकी होती. त्यामध्ये भारताचा वाटा 61 लाख टन इतका होता, तरीही जागतिक पातळीवर गतवर्षी ब्राझीलकडून उपलब्ध होणारी साखर कमी झाल्यामुळे साखरेचे भाव चढेच राहत गेले. ब्राझीलमध्ये 2022-23 मध्ये 365 लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

तथापि, भारतात येणार्‍या 2023-24 च्या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन किती होईल, याचे अंदाज हाती येत नसल्याने आणि आता झालेल्या मान्सूनचा परिणाम किती होईल, याचा अंदाज येऊ शकत नसल्यामुळे भारताने एका विशिष्ट टप्प्यावर साखर निर्यात थांबवली. त्यामुळे गेल्या हंगामात साधारणतः जानेवारीपासून साखरेचे भाव जगभर चढेच राहत गेले.

कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, नगर हे चार विभाग प्रामुख्याने साखर उत्पादनात आघाडीवर असून 75 टक्क्यांपेक्षा जास्त साखर या चार विभागांत तयार होते. त्या पाठोपाठ औरंगाबाद आणि नांदेड या विभागांमध्ये साधारणतः 20 ते 22 टक्के साखर तयार होते. अमरावती आणि नागपूर या विभागांत केवळ एक टक्का इतकी साखर तयार होते.

गतवर्षी महाराष्ट्र आणि देशामध्ये अंदाजापेक्षा कमी साखर उत्पादित झाली, तरी आपल्याकडे असलेला सुरुवातीचा साठा याचा विचार करता या साखर वर्षात 30 सप्टेंबर 2023 पर्यंत संपलेल्या ज्या 275 लाख टन साखरेचा वापर होतो, तो सोडून आणि 61 लाख टन निर्यात जाऊन आपल्याकडे सुमारे 45 ते 50 लाख टन साखरेचा साठा या वर्षाच्या सुरुवातीला आरंभीचा साठा म्हणून असेल, अशी स्थिती आहे. आता 2023-24 च्या गळीत हंगामाचा विचार केला, तर याही हंगामात महाराष्ट्रामध्ये बर्‍याच ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली आणि विशेषतः पाऊस पडला तो अगदी कमी काळ. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने पूर्ण ओढ दिली आणि सप्टेंबरच्या अखेरीस काही भागांमध्ये पाऊस झाला; परंतु या अनियमित पडलेल्या पावसामुळे जे काही क्षेत्र उसाखाली आहे, ते क्षेत्र 2022-23 इतकेच असले, तरी त्यापासून निर्माण होणारा ऊस हा हेक्टरी टनेज घटत असल्यामुळे आपल्याला कमी उपलब्ध होईल, अशा प्रकारचे अंदाज साखर आयुक्तालयाकडून बांधण्यात आले असून 2023-24 मध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः 970 लाख टन ऊस गळितास उपलब्ध होईल. त्यामधून सुमारे 94 लाख टन साखर तयार होईल, असा अंदाज आहे. त्याच जोडीला देशपातळीवर या वर्षी 326 लाख टन साखर उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

तथापि, पीक परिस्थिती पाहता आणि एकंदरीत महाराष्ट्र आणि शेजारचा कर्नाटक या दोन राज्यांच्या उत्पादनाचा विचार केला, तर या दोन्ही राज्यांमध्ये अनियमित पावसामुळे ऊस पिकास मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाळप होऊन किती साखर तयार होईल, याचा अंदाज आजच्या घडीला येऊ शकत नाही, तरीही 316 टनाचा अंदाज आणि सुरुवातीचा 50 लाखांचा साठा गृहीत धरला आणि या वर्षी 280 लाख टन एवढा वापर देशामध्ये गृहीत धरला, तर पुढील हंगामामध्ये आपल्या हातामध्ये साखर साठा पुरेसा आहे असे दिसते. याचा परिणाम असा होतो की, हा जेमतेम साठा हातात असल्यामुळे या वर्षी जागतिक पातळीवर साखरेचे भाव चढे असूनदेखील त्याचा लाभ भारत किंवा महाराष्ट्र घेऊ शकत नाही. त्यामुळे या वर्षी भारताकडून निर्यातीसाठी साखर उपलब्ध असेल, अशी चिन्हे नाहीत. किंबहुना भारताकडून निर्यातीसाठी साखर उपलब्ध असणार नाही.

साखरेच्या जोडीलाच इथेनॉलचा आपण विचार केला, तर 2022-23 या हंगामामध्ये देशभरातून 41 लाख टन आणि महाराष्ट्रातून साधारण 13 लाख टन एवढी साखर इथेनॉलसाठी वळविली गेली. त्याचा परिणाम म्हणून देशपातळीवर पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्या द़ृष्टीने नियोजन सुरू असून इथेनॉलच्या निर्मितीसाठीही 41 ते 42 लाख टन साखर वापरली गेली. त्यातून जोडीलाच उपलब्ध असलेल्या मोलॅसिसमधूनही इथेनॉलनिर्मिती करून त्याचा पुरवठा तेल उत्पादक कंपन्यांना झालेला आहे.

Back to top button