छगन भुजबळांना पुन्हा धक्का, आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ | पुढारी

छगन भुजबळांना पुन्हा धक्का, आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाय मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांचीही साथ सोडत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

पवार म्हणाले की, सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर बाजार समितीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपासून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड आणि शिवसेनेचे (उबाठा) ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. शेतकरीहिताचे निर्णय घेण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका यामुळे आपण पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, उबाठा शिवसेना आघाडीतर्फे बाजार समितीची निवडणूक लढवली, त्यावेळी मी बाजार समितीची निवडणूक लढविण्यास तयार नव्हतो मात्र, दीपक गोगड आणि गणेश धात्रक यांनी, जर संजय पवार निवडणूक लढवत नसतील, तर आमच्यापैकी कोणीही निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे भुजबळ यांच्या सांगण्यावरून मी मैदानात उतरलो आणि सत्ता काबीज केली. मात्र, पहिल्या सर्वसाधारण सभेपासून गोगड यांनी अर्ज, निवेदने देऊन एक प्रकारे मला काम करण्यास मज्जाव केला. त्यांना धात्रक यांनी साथ दिल्याचा आरोप पवार यांनी केला. चार महिन्यांत वारंवार असे प्रकार घडत होते. याबाबत भुजबळ यांना माहितीदेखील दिली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. ज्या पक्षात आपण काम करतो. तोच पक्ष विरोध करत असेल आणि नेते त्याची साधी देत असतील, तर मग पदावर आणि पक्षात राहण्यात काय अर्थ, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी, जातपात मानणारा नाही. मला आमदार, बाजार समितीचे सभापती सर्व जाती-धर्माच्या लोकांनी केले. मात्र, भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत समाजात नाराजी आहे. ज्या समाजात जन्मलो, त्या समाजावरच अन्याय होत असेल, तर कसे चालणार असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

अवघ्या चार महिन्यांचे सभापती?

पवार यांनी अवघ्या चार महिन्यांत सभापतिपदाचा राजीनामा, शिवाय भुजबळांचीदेखील साथ सोडल्याने मनमाडसह नांदगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे. भुजबळ आणि माजी आ. पंकज भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Back to top button