सांगलीकरांचा पाण्यासाठी टाहो; शासन ढिम्म | पुढारी

सांगलीकरांचा पाण्यासाठी टाहो; शासन ढिम्म

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा नदीचे येथील पात्र पाच दिवसांपासून कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठासह अनेक गावांतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिंचनच्या योजनाही ठप्प आहेत. कोयनेतून पाणी सोडण्यासंदर्भात गुरुवारी सातारा येथे तेथील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पाटबंधारे विभागाची बैठक होणार होती, मात्र ती झालीच नाही. ती आता आज (दि. 27) होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे पाण्यासाठी सांगलीकरांची फरफट सुरूच आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी पाण्याच्या मागणीसाठी उद्या (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.

यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यात कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे कोयनेतून कृष्णा नदीत पाणी सोडले जात नाही. दुसर्‍या बाजूला अपुरा पाऊस व ऑक्टोबर हीटमुळे नदीतून पाणीउपसा मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी नदीपात्र पाच-सहा दिवसापासून पूर्ण कोरडे पडले आहे. कृष्णा नदीतून सांगलीपासून कराडपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी 82 पाणी योजना आहेत. त्यापैकी 70 पाणी योजना या नदीपत्रात पाणी नसल्याने बंद पडल्या आहेत.

या योजनांवर अवलंबून असलेल्या पलूस, विटा यासारख्या शहरांसह अनेक गावांतील पिण्याचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्याशिवाय ताकारी, म्हैसाळ, टेंभू या सिंचन योजनाही बंद आहेत. किमान पिण्यासाठी तरी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पंधरा दिवसापासून सातारा पाटबंधारे विभागाकडे करीत आहे, मात्र सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मंजुरीशिवाय पाणी सोडले जात नाही, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सातार्‍यातील आजची बैठक झाल्यानंतर आज (दि. 27) सायंकाळी पाणी सोडण्याचे आश्वासन मिळण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही सांगली जिल्ह्यासाठी कृष्णा नदीत पिण्यासाठी कोयनेतून पाणी तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच सातारा पालकमंत्री देसाई यांच्याशी संपर्क करून केली आहे.
जिल्ह्यातील खासदार संजय पाटील, आ. अनिल बाबर, आ. अरुण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींचा उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री देसाई, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, मात्र पाणी सोडले जात नाही.

जनसुराज्यतर्फे फडणवीस यांना निवेदन

जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाण्यासाठी निवेदन दिले आहे. तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

पाटबंधारेच्या अधिकार्‍यांची पुण्यात अभियंत्याशी भेट

विविध स्तरातून पाणी सोडण्याबाबत येथील पाटबंधारे अधिकार्‍यांवर दबाव वाढत आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून पाणी सोडले जात नसल्याने अधिकार्‍यांची कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील अधिकार्‍यांनी विभागाच्या मुख्य अभियंत्यांंची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगून, पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करण्याची मागणी केली.

Back to top button