पिंपरी-चिंचवड शहरात 63 ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरात 63 ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :

फेरीवाला समिती बैठकीत महापलिका आयुक्तांची मंजुरी

पिंपरी-चिंचवड शहरात विविध 63 ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. तेथे तब्बल 4 हजार 194 विक्रेत्यांना व्यवसाय करता येणार आहे. शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्यास मंजुरी दिली आहे. महापालिकेतील बुधवारी (दि.25) झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, भूमी व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक व क्षेत्रीय अधिकारी तसेच, शहर फेरीवाला समितीचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीमध्ये शहरांमधील विविध भागांमध्ये जे फेरीवाले व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी त्याच भागांमध्ये हॉकर्स झोन किंवा फेरीवाले क्षेत्र निर्माण करण्याचे ठरविले आहे. ज्या भागात जास्त प्रमाणात रहदारीस अडथळा निर्माण होतो, अशा ठिकाणी प्राधान्याने हॉकर्स झोन निर्माण करण्यात येणार आहे. तेथील रस्ते व चौक मोकळे करण्यात येणार आहेत.

फेरीवाल्यांमुळे रहदारीस अडचणी निर्माण होते. तसेच, पदपथावर अतिक्रमण झाल्याने फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई होते, अशा फेरीवाल्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. हॉकर्स झोनमध्ये शहरातील अधिकृत फेरीवाले यांना क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण विभाग व विविध फेरीवाला संघटना यांच्या समन्वयातून जागा वाटप करण्यात येणार आहे. फेरीवाल्यांसाठी जागेचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. जागेचे भाडे दिल्यानंतर फेरीवाल्याला त्या जागेचा वापर करता येणार आहे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा

शहर सीसीटीव्हींच्या नजरेच्या टप्प्यात

नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात, 12 सायकली जप्त

Crime News : व्यापार्‍याला लुटणार्‍या सराईतासह चारजण जेरबंद

Back to top button