कोल्हापूर : उदगावमध्ये गोकुळच्या सॅटेलाईट सेंटरमध्ये आंदोलक-पोलिसांत झटापट | पुढारी

कोल्हापूर : उदगावमध्ये गोकुळच्या सॅटेलाईट सेंटरमध्ये आंदोलक-पोलिसांत झटापट

जयसिंगपूर : संतोष बामणे

सरकारने गाईच्या दुधाला ३.५/८.५ या फॅटला ३४ रुपये प्रतिलिटर दर निश्चित केला आहे, असे असताना गोकूळ दूध संघाकडून ३३ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी घेतली जात आहे. त्यामुळे गोकूळकडून शेतकर्‍यांची लूट थांबवा, अशी मागणी करीत आंदोलक अंकुशने उदगाव (ता. शिरोळ) येथे गोकूळच्या सॅटेलाईट सेंटरमध्ये ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आंदोलक उठत नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असल्याने आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.

संबंधित बातम्या –

दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी आंदोलक अंकुशच्या कार्यकर्त्यांना पोलीस वाहनातून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी आंदोलक अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमूंगे यांनी पोलिसांनी बेकायदेशीररित्या आंदोलन मोडून काढण्यासाठी आम्हाला उचलून पोलीस ठाण्यात आणले आहे. मग, आम्हाला कोर्टात उभे करा, अशी मागणी करत कार्यकर्ते दिवसभर पोलीस ठाण्यातच बसून राहिले होते.

उदगाव : येथे गोकूळच्या सॅटेलाईट सेंटरसमोर आंदोलन करताना अंकुशचे पदाधिकारी.

सोमवारी सकाळी उदगाव येथे गोकूळच्या सॅटेलाईट सेंटरवर ३४ रुपये प्रतिलिटर दूध द्या, या मागणीसाठी आंदोलक अंकुशच्यावतीने दूधाची वाहने थांबवून आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

धनाजी चुडमूंगे म्हणाले, १ ऑक्टोबरपासून गायीच्या दुधाला ४ रुपये दर कपाट केला आहे. त्यामुळे जिल्हाभरात आंदोलन सुरू आहे. गेल्या सोमवारी गोकूळचे चेअरमन व एम. डी. यांना भेटून गाईचे दर पूर्वीप्रमाणे करा, अशी मागणी केली होती. अन्यथा, सोमवारी उदगावच्या सॅटेलाईट सेंटरवर आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत गोकूळने निर्णय घेतला नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन केले आहे. जर शासनाने काढलेले आदेशाचे पालन दूध संघ करीत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी.

एकीकडे गोकूळ आम्हाला लुटायला लागले आहे आणि दुसरीकडे पोलीस दंडूपशाही पद्धतीने आंदोलन मोडीत काढीत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी धनाजी चुडमूंगे, उदय होगले, भूषण गंगावणे, दीपक पाटील, आप्पासो कदम, दत्ता जगदाळे, बाळू भोगावे, एकनाथ माने, शिरीष वरेकर, राजेंद्र पाटील, अक्षय पाटील, माणिक पाटील यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button