...तर मोदी नवीन ‘युनो’ उभी करतील : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

...तर मोदी नवीन ‘युनो’ उभी करतील : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचे असे स्थान निर्माण केले की प्रगत राष्ट्रांनी ‘युनो’चे सदस्यत्व देणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केल्यास मोदी नवीन युनो उभी करतील. कोरोना काळात मदत केलेले साठ देश भारताच्या बाजूने उभे राहतील,’ असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘आपल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात तीन हजार वर्षे पुराणाची आहेत. मात्र, पुराण झाले की नाही, याबाबतीत आपली शंका असते. राम झाले की नाही, याबाबतही आपली एक श्रद्धा असते. मात्र, राम आमचा मूळपुरुष आहे, असा आमचा विश्वास असतो. मात्र, त्याबाबतीत आपण म्हणतो, झाले की नाही, याबाबत माहिती नाही.’

पाच हजार वर्षांच्या इतिहासात 0 ते 2023 या कालावधीचा इतिहास लिहून ठेवला आहे. त्यानुसार 0 मध्ये भारताचा व्यापार जगाच्या व्यापारामध्ये 32 टक्के होता. त्यानंतर आक्रमणे सुरू झाल्यानंतर, हा व्यापार 800 सालामध्ये चार टक्क्यांनी कमी होऊन 28 टक्क्यांवर आला. इंग्रज जाताना हा व्यापार 3 टक्क्यांवर आला. त्यांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे आपण किती प्रगत होतो, हे स्पष्ट होते. आपण प्रगत होतो म्हणून आक्रमणे झाली. ब्रिटिश भारतात व्यापार होता म्हणूनच आले. ब्रिटिश भारतात येताना भारतीय बनावटीच्या जहाजाने आले आणि हे जहाज पुढे 87 वर्षे टिकले. हा सर्व इतिहास आपली परंपरा म्हणून अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी आम्ही कॉलेजांना देणार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले. ‘महिलांना 33 टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला. मात्र, हे महिलांचे आरक्षण भारतीय परंपरेमध्ये होते,’ असेदेखील पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button