Mumbai News : ३८ टक्के शाळाबाह्य मुले पुन्हा ज्ञानमंदिरात | पुढारी

Mumbai News : ३८ टक्के शाळाबाह्य मुले पुन्हा ज्ञानमंदिरात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शालेय शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मिळून १, ५१० मुले शाळाबाह्य आढळली आहेत. त्यापैकी ५८२ बालकांना पुन्हा शाळेत पाठवण्यात यश आले, तर ९२८ मुले अजूनही शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत. सापडलेल्या शाळाबाह्य मुलांत सर्वाधिक ९२८ मुले पालघर जिल्ह्यातील असून, त्यातील डहाणू तालुक्यातील ६७६ मुले आहेत.

राज्यातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान घेतले होते. दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे घरातील कमावत्या व्यक्तीची नोकरी गेली, अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे मुंबईत राहणे कठीण होऊन बसलेल्या अनेक कुटुंबांनी मुंबईबाहेरचा रस्ता धरल्याने मुलांचेही स्थलांतर झाले होते. गतवर्षी मुंबईतून बाहेर स्थलांतरित विद्यार्थ्यांमध्ये ३३४ मुली तर ३८९ मुले होती. यंदाही शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

सर्वेक्षणात दक्षिण, उत्तर व पश्चिम या तीन विभागातून १८२, ठाणे जिल्ह्यातून ३८० आणि रायगड जिल्ह्यातून ३८ विद्यार्थी शाळाबाहा आढळली. पालघर जिल्ह्यातील ९२८ शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये ४४१ मुले, तर ४८७ मुलींचा समावेश आहे. यातील २६३ मुले आतापर्यंत कधीच शाळेत गेलेली नाही. तर सापडेल्या पैकी ५८२ मुलांना शाळेत पुन्हा पाठवण्यात यश आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली.

शाळाबाह्य मुले शाळेत येतात कसे

शाळाबाह्य विद्यार्थी शोधताना एका गटात शाळेत न गेलेल्या तर दुसऱ्या गटात काही कारणांनी शाळेत नोंदणी असूनही शाळेला न येणाऱ्या मुलांचा समावेश असतो. अनेक पालक रोजगार कमावण्यासाठी फिरतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब विविध कारणांमुळे कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्यामुळे अनेक बालके लहान भावडांना घेवून राहतात. किंवा मोठ्या भावडांसोबत घरात राहतात किंवा अनेक मुले कामाच्या ठिकाणी आपल्या पालकांसोबत जातात. त्यामुळे ही मुले शाळेत येत नाहीत. तर काही वेळा मुले मोठी झाली की पालक त्याच्यासाठी काहीतरी काम शोधू लागतात. या मुलांसाठी शाळेत कधी नोंदणी होतच नाही, अशीही परिस्थिती आहे. जी मुले शाळेत नोंद असूनही शाळेत जात नाहीत, अशा मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करुन तसेच काही सोयीसुविधा पुरवल्या जातात आणि शाळेत पुन्हा पुन्हा बसवले जाते. यंदा अशा मुलांची संख्या ५८२ आहे.

Back to top button