Sukanya Yojana : सुकन्या योजनेत पुणे विभागात 2 हजार कोटींची गुंतवणूक; देशात 70 हजार कोटींची गुंतवणूक | पुढारी

Sukanya Yojana : सुकन्या योजनेत पुणे विभागात 2 हजार कोटींची गुंतवणूक; देशात 70 हजार कोटींची गुंतवणूक

शिवाजी शिंदे

पुणे : ‘थेंबे-थेंबे तळे साचे’ हे ब्रीद स्वीकारत टपाल विभागाने 2014 पासून मुलींसाठी सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचे फलित आता दिसू लागले आहे. गेल्या आठ वर्षांत पुणे विभागातील सहा लाख मुलींच्या नावे या योजनेत तब्बल 2,234 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशात पुणे विभागातील मुली गुंतवणुकीच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र शासनाच्या टपाल विभागाने देशातील मुलींच्या भविष्यासाठी 2014- 15 मध्ये अनोखी योजना सुरू केली. त्याला देशभरातील घराघरातून उदंड प्रतिसाद मिळाला.

पुणे प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत पुण्यासह नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता देशभरातील प्रत्येक राज्याच्या गुंतवणुकीचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, देशात महाराष्ट्र, तर महाराष्ट्रात पुणे विभाग गुंतवणुकीत आघाडीवर आहे. गेल्या आठ वर्षांत पुणे विभागात सुमारे 6 लाख 6 हजार 100 इतकी खाती उघडली गेली आहेत.

यात 2 हजार 234 कोटी 66 लाखांची गुंतवणूक झाली आहे. 36 राज्यांनी मिळून आठ वर्षांत 70 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्रात साडेसात हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूने साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. यात काही आकडेवारी ही 2020 पर्यंतची असून, ती केंद्र शासनाने अपडेट केलेली नाही.

काय आहे योजना?

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत सुरुवातीला किमान एक हजार रुपये या खात्यात भरावे लागत होते; मात्र त्यानंतर केंद्र शासनाने ही रक्कम कमी करून 250 रुपये केली. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुलभ हप्त्याने रक्कम भरता येऊ लागली. यामुळे द्रारिद्य्ररेषे खालील लाखो कुटुंबांचे खाते पोस्टात सुरू झाले. या योजनेअंतर्गत किमान 250 पासून ते दीड लाख रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. ही योजना 15 वर्षांसाठी आहे. सध्या या योजनेतील रकमेवर 8 टक्के दराने व्याज दिले जाते. बँकांतील अन्य कुठल्याही योजनेपेक्षा हे व्याज दर जास्त आहेत.

हेही वाचा

पुणे जिल्हा परिषद भरती; प्रवेशपत्र मिळेनात

Fasting Food Makhana Kheer : उपवासादरम्यानचा हेल्दी पर्याय म्हणजे मखाण्याची खीर; जरूर ट्राय करा

Talathi Exam : तलाठी परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये

Back to top button