पुणे जिल्हा परिषद भरती; प्रवेशपत्र मिळेनात | पुढारी

पुणे जिल्हा परिषद भरती; प्रवेशपत्र मिळेनात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी परीक्षेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र मिळविण्यासाठी उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेकडे अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर तत्काळ प्रवेशपत्राचा प्रश्न सोडविल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी दिली. ऑनलाईनद्वारे होत असलेल्या परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यात तीन पदांच्या परीक्षा घेण्यात आल्या.

ज्या पदाची परीक्षा जाहीर करण्यात येत आहे, त्याची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जात आहेत. रविवारी (दि. 15) होणार्‍या परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. त्यानुसार परीक्षा प्रक्रिया राबवत असलेल्या आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून या अडचणी सोडविण्यावर जिल्हा परिषदेकडून काम केले जात आहे.

दरम्यान, उमेदवारांनी इतर जिल्हा परिषदेची परीक्षादेखील पुणे केंद्रावर देण्याची व्यवस्था असल्याने, अनेकांनी पुणे केंद्रावरून परीक्षा देण्याला पसंती दिली आहे. मात्र, दुसर्‍या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचे प्रवेशपत्राची समस्या असल्यास ज्या जिल्हा परिषदेच्या पदासाठी परीक्षा देण्याची आहे, त्या जिल्हा परिषदेला संपर्क करावा लागणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण 20 हजार जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती होत आहे. पुणे जिल्हा परिषदेत एक हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. जिल्हा परिषदेत गट ’क’ सवंर्गातील 21 पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

हेही वाचा

Talathi Exam : तलाठी परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये

Pune News : ताण-तणावाचा मेंदूच्या न्यूरल सर्किटवर परिणाम; उंदरांवर प्रयोग करून काढला निष्कर्ष

माझ्या जीवाची किंमत फक्त तीन हजार रुपये ! हेरंब कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

Back to top button