Pune News : खराब साहित्य संकलनासाठी पालिकेची विशेष मोहीम | पुढारी

Pune News : खराब साहित्य संकलनासाठी पालिकेची विशेष मोहीम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दसरा, दिवाळी निमित्त घरांच्या रंगरंगोटी आणि स्वच्छतेच्या निघणारे निरुपयोगी व खराब साहित्य संकलित करण्यासाठी महापालिका येत्या 14 तारखेपासून विशेष मोहीम सुरू करणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

या मोहिमेत देवघरातील खराब झालेले पूजा साहित्यही 28 व 29 ऑक्टोबरला संकलित केले जाणार आहे. दसरा, दिवाळी या मोठ्या सणांच्यावेळी घरांची स्वच्छता आणि नवीन वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. या काळात फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाद्या, उश्या, कपडे यासारख्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. त्याचवेळी जुन्या वस्तू भंगारात दिल्या जातात. ज्या वस्तू भंगारात जात नाहीत त्या कच-यात टाकल्या जातात. त्या वस्तू महापािलिका संकलित करते.

यंदाही येत्या 14 ऑक्टोबरपासून महापालिका चिंध्या, उश्या, गाद्या, जुने फर्निचर गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे. प्रत्येक प्रभागातील किमान दोन आरोग्य कोठ्यांमध्ये सकाळी दहा ते चार या वेळेत या वस्तू स्वीकारल्या जातील. यासोबतच ई-वेस्ट गोळा करण्याच्या मोहिमेची अधिक व्यापक करण्यासाठी 5 नोव्हेंबरपासून महापालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया, पूर्णम इकोव्हिजन, सागर मित्र, थंब क्रिएटिव्ह, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटीव्ह व इतर शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध 300 ठिकाणी ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन महाअभियान राबविणार आहे.

देवी-देवतांचे खराब झालेले फोटो व वस्तू संकलन

देवघरातील देवी-देवतांचे खराब झालेले फोटो, मूर्ती व अन्य साहित्य नदीत, रस्त्याच्या कडेला, नदीपात्र, तलावांच्या बाजूला किंवा झाडांच्या बुंध्यांशी ठेवतात. या पार्श्वभूमीवर त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी महापालिका देवी-देवतांसंबधित सर्व वस्तू व साहित्य गोळा करण्यासाठी 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम हाती घेणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने निश्चित केलेल्या जागेवर सकाळी 10 ते दुपारी चार वाजेदरम्यान या वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.

हेही वाचा

Bhimrao Tapkir : भीमराव तापकीर यांच्या बनावट खात्यावरून पैशांची मागणी

Nashik ZP Exam : जि. प. पदभरतीसाठी १५, १७ ऑक्टोबरला परीक्षा

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा : 80 देशांच्या प्रमुखांना विशेष आमंत्रण

Back to top button