

अयोध्या; वृत्तसंस्था : येथील भव्य श्रीराम मंदिराचे काम वेगाने सुरू असून 22 जानेवारी 2024 रोजी होणार्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगातील 80 देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. हा सोहळा भव्य असणार आहे.
मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठेदरम्यान देशातूनच नव्हे तर विदेशातील पाहुण्यांची यादी तयार केली आहे. ट्रस्टने तयार केलेल्या यादीत भारतासह जगातील 80 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे. कुंभमेळ्याच्या धर्तीवर अयोध्येतही पंचतारांकित सुविधा असलेले तंबू तयार केले जात आहेत. हे तंबू पहिल्या कुंभाच्या वेळीच बनवण्यात आले आहेत.
मंदिराच्या 14 प्रमुख दरवाजांवर सोन्याचा पत्रा मढविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रामलल्लांचे सिंहासनदेखील सोन्याचे असणार आहे.
याखेरीज मंदिराच्या भव्य सिंहद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. सोबतच नृत्य मंडप, फरशीवरील नक्षीकामही अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या मजल्यावरील साठ टक्के बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
मंदिराच्या ट्रस्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या बांधकामात तीन हजार मजूर रात्रंदिवस काम करत आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत मंदिराच्या बांधकामावर 900 कोटी रुपये खर्च झाले आहेत. एकूण खर्च 1800 कोटी रुपये अपेक्षित आहे.
श्री रामजन्मभूमी येथील मंदिर झपाट्याने आकार घेत आहे. मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार पहिल्या मजल्यावरील 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तीन मजली राम मंदिराचा तळमजला तयार आहे. तळमजल्यावर 170 खांब आहेत. या मजल्याचे सर्व 14 दरवाजेही तयार आहेत. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार तळमजल्यावर फिनिशिंगचे काम सुरू आहे. खांबांवर देवांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत. तळमजल्याची ही सर्व कामे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा :