Navaratri-Nine forms of Goddess Durga : देवीची ९ रुपे कोणती? | पुढारी

Navaratri-Nine forms of Goddess Durga : देवीची ९ रुपे कोणती?

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. माता शैलपुत्री दुर्गेचा पहिला अवतार आहे. म्हणून तिला शैलपुत्री म्हणतात. (Navaratri-Nine forms of Goddess Durga) नवदुर्गांमध्ये माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री आहेत. नवरात्रीतील नऊ दिवस या मातेची आराधना होते. (Navaratri-Nine forms of Goddess Durga)

दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री

वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्। वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम् ॥

दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ या नावाने ओळखले जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे ‘तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे. (Navaratri 2023 Shailputri)

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. (Navaratri 2023 Shailputri) आपल्या पूर्वजन्मात तिने दक्ष प्रजापती राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. एकदा दक्षाने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले की, प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले, तरीही तिचे समाधान झाले नाही. (Navaratri-Nine forms of Goddess Durga )

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे, याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले.

याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म ‘घेतला. यावेळी ती ‘शैलपुत्री’ या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. ‘शैलपुत्री’ देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

दुर्गेचे दुसरे रूप – ब्रह्मचारिणी

दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥

‘नवशक्तींपैकी ‘ब्रह्मचारिणी’ हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. (Navratri 2023 Brahmacharini) येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. (Navratri 2023 Brahmacharini)

या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारदमुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा, यासाठी कठोर तपस्या करायला सांगितले होते. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की, ‘हे देवी! तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील, ‘ असा वर त्यांनी दिला. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.

दुर्गेचे तिसरे रूप – चंद्रघंटा

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकेर्युता। प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता ॥

दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव ‘चंद्रघंटा’ आहे. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा (Navratri 2023 Chandraghanta ) देवी असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खडग्, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून, मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. (Navaratri-Nine forms of Goddess Durga)

माता चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयताबरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते. आवाजात मधुरता येते. माता चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात, तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.

दुर्गेचे चौथे रूप- कुष्मांडा

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च । दधाना हस्तपद्माभ्यां कुष्मांडा शुभदास्तु मे ॥

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. आपल्या स्मित हास्यातून ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी (Navratri 2023 Kushmanda) असे म्हटले जाते. तिला कुष्मांड (कोहळा) बळी अधिक प्रिय आहे. (Navratri 2023 Kushmanda)

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘अनाहत’ चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.

तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिच्या तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भूजा आहेत. ही देवी अष्टभूजा या नावानेही प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.

कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगांपासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.

दुर्गेचे पाचवे रूप – स्कंदमाता

सिंहसनगता नित्यं पद्माश्रित करद्वया । शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ॥

दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. (Navratri 2023 Skandamata) भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जाते. ते देवासुर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. (Navratri 2023 Skandamata)

स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे. त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.

स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते. मृत्युलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुर्गेचे सहावे रूप – कात्यायनी

चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूल वरवाहना। कात्यायनी शुभं ददयाद्देवी दानव घातिनी ।।

दुर्गेचे हे सहावे रूप ‘कात्यायनी’ या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. (Navratri 2023 Katyayani ) परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. (Navaratri-Nine forms of Goddess Durga)

दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले, यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.

काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता.

सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा पुराणात आहे.

कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेज:पुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीच्या उजव्या अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.

कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते. तो ईहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव होतो. जी व्यक्ती मातेची मनापासून पूजा करते, ती रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होते. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.

दुर्गेचे सातवे रूप – कालरात्री

एकवेणी जपाकर्ण पूरा नग्ना खरास्थिता । लम्बोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी । वामपादोल्लसल्लोह लता कण्टक भूषणा । वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी ॥

दुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या देवीचा रंग काळा आहे. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. (Navratri 2023 Kalratri ) कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे, तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खडग (कट्यार) आहे. (Navratri 2023 Kalratri )

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु, ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’ सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णतः भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.

मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाच्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.

दुर्गामातेचे आठवे रूप – महागौरी

श्वेते वृषे समारूढ श्वेताम्बरधरा शुचिः । महागौरी शुभं ददयान्महादेवप्रमोदया ।।

दुर्गामातेचे आठवे रूप म्हणजे ‘महागौरी’ होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. (Navratri 2023 Kalratri ) महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात. भविष्यात पाप-संताप, दुःख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्यापणाची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. (Navratri 2023 Kalratri)

तिचे वस्त्र आणि आभूषणंदेखील श्वेत रंगाची आहेत. महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने अंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.

दुर्गेचे नववे रूप – सिद्धीदात्री

या देवी सर्वभूतेषु सिद्धिदात्री रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

दुर्गामातेची नववी शक्ती म्हणजे ‘सिद्धीदात्री’ होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. (Navratri 2023 siddhidatri) अणिमा, महिमा, गरीमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. (Navratri 2023 siddhidatri)

भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात. देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हेदेखील वाचा-

 

Back to top button