ICC ODI World Cup : विराट-राहुलची जिगरबाज खेळी! भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय | पुढारी

ICC ODI World Cup : विराट-राहुलची जिगरबाज खेळी! भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI World Cup : विराट कोहली (115 चेंडूत 85) आणि केएल राहुल (115 चेंडूत नाबाद 97) यांच्या झुंझार खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कांगारूंच्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. अवघ्या दोन धावांत भारताने तीन विकेट गमावल्या होत्या. पण कोहली-राहुल जोडीने जिगरबाज खेळी करून भारताला विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला. या दोघांनी 215 चेंडूत विक्रमी 165 धावांची भागिदारी रचली.

ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 200 धावांचे आव्हान होते. हे आव्हान माफक वाटत होते. पण हे आव्हान थिटे दिसत असले तरी भारताला सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसायला लागले. भारताला पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर पहिला धक्का बसला. इशान किशन गोल्डन डक वर बाद झाला. त्याचा स्टार्कने माघारी पाठवले. यानंतर पुढच्याच दुस-या षटकात हेजलवूडने भारताला एकामागून एक दोन झटके दिले. त्याने तिस-या चेंडूवर रोहित शर्मा आणि त्यानंतर सहाव्या चेंडूवर श्रेयस अय्यर यांना बाद करून भारताचे कंबरडे मोडले. भारताच्या या दोन्ही फलंदाजांना खाते उघडता आले नाही. भारताची 3 बाद 2 अशी दयनीय अवस्था होती. संघ अडचणीत सापडला होता. एकामागून एक धक्के बसत असताना भारत हा सामना गमावेल, अशी धाकधून लागून राहिली. पण संघासाठी विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी संकटमोचकाची भूमिका साकारली आणि अत्यंत जबाबदारीने खेळ केला. विराटने 116 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 तर लोकेश राहुलने 115 चेंडूत 2 षटकार आणि आठ चौकारांच्या जोरावर 97 धावांची दणदणीत खेळी साकारली. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याला मैदानात उतरला. त्याने 11 धावा केल्या आणि भारताच्या विजयाला हातभार लावला. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली.

विराटचा झेल सोडणे ऑस्ट्रेलियाला पडले महागात

12 धावांच्या स्कोअरवर विराट कोहलीला जीवदान मिळाले. जोश हेजलवूडच्या चेंडूवर कोहलीने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हवेत गेला. मिचेल मार्श झेल घ्यायला धावला, पण चेंडू त्याच्या हातात आलाच नाही.

विराट-केएलने मोदला एबी-स्मिथचा विक्रम

विराट कोहलीने 114 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या आणि केएल राहुल सोबत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर या दोन्ही फलंदाजांनी द. आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स आणि ग्रॅमी स्मिथ यांचा विक्रम मोडीत काढला. या दोन फलंदाजांनी 2007 मध्ये कांगारू संघाविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकात 160 धावांची भागीदारी केली होती, मात्र आता हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर घसरले असून कोहली आणि राहुल दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वात मोठी भागीदारी

168 धावा – जर्मेन/हॅरिस (1996)
165 धावा – कोहली/राहुल (2023)
160 धावा – एबीडी/स्मिथ (2007)

कोहलीने मोडला संगकाराचा विक्रम

एकदिवसीय क्रिकेटमधली ही 113 वी वेळ होती जेव्हा विराट कोहलीने एका सामन्यात 50 प्लसची इनिंग खेळली. अशाप्रकारे त्याने कुमार संगकाराला (112) मागे टाकले. आता कोहली या बाबतीत संगकाराच्याही पुढे गेला आहे आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा 50 प्लसची इनिंग खेळणार नॉनओपनिंग बॅट्समन बनला आहे.

एकदिवसीय विश्वचषकातील विराट कोहलीची सर्वात मोठी धावसंख्या

107 धावा : विरुद्ध पाकिस्तान, अॅडलेड, 2015
100* धावा : विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2011
85 धावा : विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, 2023

ऑस्ट्रेलियन संघ 199 धावांवर ऑलआऊट

ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. मिचेल मार्श खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिम्थने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्ही खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. वॉर्नर 41 धावा करून बाद झाला तर स्मिथ 46 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेनने 27 धावांचे योगदान दिले. शेवटी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने काही मोठे फटके मारले. स्टार्कने 15 आणि कमिन्सने 28 धावा केल्या. पण त्यांचा संपूर्ण संघ 49.3 षटकांत 199 धावांत ऑलआऊट झाला. त्यामुळे भारताला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Back to top button