किरीट सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात याचिका दाखल | पुढारी

किरीट सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात याचिका दाखल

नागपुर ; पुढारी वृत्तसेवा

राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारे भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व नेत्यांच्या विरोधात रोजच्या रोज आरोप करून सरकारला बदनाम करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात अखेर काँग्रेसनं कठोर पाऊल उचललं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात सिव्हिल व क्रिमिनल याचिका दाखल केली आहे.

अतुल लोंढे यांनी स्वत: आज ही माहिती दिली. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून किरीट सोमय्या हे रोजच्या रोज सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत आहेत. ठाकरे कुटुंबीयांवरही काही दिवसांपूर्वी त्यांनी आरोप केले होते. साखर कारखान्यांतील घोटाळ्यांच्या विरोधातही ते रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेत असतात.

‘हे वसुली सरकार असून वसुलीच्या पैशातील ४० टक्के रक्कम शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना केला होता. हा आरोप धांदात खोटा असून, त्यामुळं काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीची बदनामी झाली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपांना लगाम घातला जावा म्हणून त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे, असं लोंढे यांनी सांगितलं.

सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते बोलत असतात. त्यामुळंच आम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं लोंढे यांनी सांगितलं.

पहा व्हिडिओ : गावात लाईट आली आणि साजरा झाला खरा दीपोत्सव | Diwali2021

Back to top button