Pune : खेड तालुक्यात भूमाफियांचा सुळसुळाट ; राजकारण्यांचा अर्थपूर्ण वरदहस्त | पुढारी

Pune : खेड तालुक्यात भूमाफियांचा सुळसुळाट ; राजकारण्यांचा अर्थपूर्ण वरदहस्त

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  खेड तालुक्यात गेल्या काही वर्षांत भूखंडमाफियांचा उदय झाला आहे. आता हे माफिया एकतर स्वतः राजकारणी आहेत किंवा त्यांच्यावर तालुक्यातील प्रभावी राजकारणी लोकांचा हात आहे. गोरगरीब नागरिकांवर जमिनी देण्यासाठी जबरदस्ती केली जाते. ‘सिव्हिल मॅटर’ असल्याने अनेक वेळा पोलिस देखील नाइलाज असल्याचे सांगत बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे दांडगाई करून जमीन बळकावणार्‍या मंडळींना त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

खेड तालुक्याच्या चारही दिशांना अशा राजकारणी भूखंडमाफियांनी धुमाकूळ घातल्याने महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने दबाव झुगारून अशा भूखंडमाफियांचा बीमोड करण्याची गरज आहे. खेड तालुक्यात मोक्याची जागा, स्वस्तात लाटता येईल अशी वतनी जागा कुणाची आहे, त्याच्यामागे कोण आहे, त्याची आर्थिक क्षमता काय आहे, कोणत्याप्रकारे त्याच्यावर दबाव आणता येईल याची संपूर्ण माहिती काढण्यात येते. जमिनीचा गट नंबर आणि मालक याबाबी समोर आल्या की प्रशासनाचा व जमीन मालकाशी संबंधित असलेल्या तालुक्याच्या बाहेरील लोकांचा आधार घेतला जातो. त्यानंतर बळाचा वापर करून मूळ मालकाला त्रास देणे सुरू होते. या प्रकारामुळे जागेचा मूळ मालक हतबल होतो. अशी शेकडो प्रकरणे समोर येत आहेत. काही जागांबाबत प्रशासनाला हाताशी धरून बळाचा वापर करून जागा बळकावणे आणि त्यावर ताबा मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत.

तालुक्यात शेकडो वादग्रस्त प्रकरणे
तालुक्यातील कित्येक जागा अत्यल्प किमतीला बळाचा वापर करून हडपून अजूनही या राजकारणी मंडळींची भूक शमत नसल्याने सामान्य नागरिक चिंतेत आहेत. अनेकदा जी जमीन बळकवायची असते, त्यात वाद लावून देण्यात येतात. महसूल विभागात सुरू असलेल्या दाव्यांमध्ये राजकारणी हस्तक्षेप करून दबाव आणण्याचे प्रयत्न करतात. खरा मालक न्यायालयातून तरी न्याय मिळेल, या अपेक्षेवर प्रतीक्षा करीत आहेत. खेड तालुक्यात अशी शेकडो प्रकरणे वादग्रस्त आहेत.

 

Back to top button