किरीट सोमय्यांची पुन्हा दिल्लीवारी ! केंद्रीय वित्त,सहकार मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी | पुढारी

किरीट सोमय्यांची पुन्हा दिल्लीवारी ! केंद्रीय वित्त,सहकार मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचारसंबंधी कारवाईची मागणी करीत सोमवारी दिल्ली गाठून सहकार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्राप्तिकर विभागाकडून गोठवण्यात आलेल्या १ हजार २५० बेनामी खात्यातील ५३.७२ कोटी रूपयांच्या खात्यांसंबंधी माहिती यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सोमय्या यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यासह राज्यातील इतर भागात आणि इतर जिल्ह्यांमध्ये सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून मोठा घोटाळा होत असल्याचे डॉ.सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले. खासदार भावना गवळी यांच्या ‘बालाजी पार्टिकल बोर्ड को-ऑपरेटिव्ह’ ने अशाचप्रकारे राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे (एनसीडीसी) ४५ कोटींचे कर्ज हडप केल्याचा आरोप देखील या भेटीदरम्यान सोमय्या यांनी केला.

वित्त विभागासह इतर विविध तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी देखील सोमय्या यांनी भेट घेत त्यांसोबत राज्यातील सहकार क्षेत्रातीत भष्ट्राचारासंबंधी चर्चा केल्याचे कळते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवाराची ‘जयस्तुते व्यवस्थापन कंपनीचा’ ग्रामीण विकास मंत्रालयातील घोटाळा तसेच गडहिंग्लज साखर कारखान्यातील घोटाळ्याच्या तपासासंबंधी वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली.

शिवाय लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सहकारी संस्थांमधील आंतरसंबंधीय घोटाळ्यांची त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. मराठवाड्यातील एका साखर कारखान्यातील भष्ट्राचारासंबंधी देखील त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे सोमय्या यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

राज्यातील ठाकरे सरकारमधील नेते आणि मंत्र्यांशी संबंधित आणखी चार घोटाळ्यांच्या तपासाला येत्या काही आठवड्यांमध्ये गती मिळेल, असा दावा या भेटींनंतर सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button