Somaiya Vs Congress : किरीट सोमय्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार | पुढारी

Somaiya Vs Congress : किरीट सोमय्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : “किरीट सोमय्या (Somaiya Vs Congress) यांनी आरोप करून काँग्रेसच नव्हे, तर महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे . माध्यमांसमोर येऊन खोटे सांगण्याची त्यांना सवय झाली आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप कपोलकल्पित आहेत. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. सातत्याने बिनबुडाचे आरोप करून काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणीही काॅंग्रेसचे मुख्य प्रवक्ते लोंढे यांनी केली. येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय चॅनलवर डिबेटमध्ये राज्य सरकारवर आरोप केले होते. त्यावर लोंढे म्हणाले की, “काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करून पक्षाला बदनाम करण्यात येत असल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.”

“एका वाहिनीवरील चर्चेदरम्यान माझ्यासह किरीट सोमय्या (Somaiya Vs Congress) फोनवरून सहभागी झाले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवरून मी पक्षाची भूमिका मांडत असताना सोमय्या यांनी आरोप केले. १०० कोटी रुपयांतून ४० कोटी रुपये राष्ट्रवादी काँग्रेस, ४० कोटी रुपये शिवसेना आणि २० कोटी रुपये काँग्रेसला मिळाल्याचा धादांत खोटा आरोप त्यांनी केला. यावर लगेच पुरावे द्या, आरोप सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे सांगितल्यानंतर ते फोन बंद करून चर्चेतून बाहेर पडले”, असे अतुल लोंढे यांनी सांगितले.

“सोमय्या आणि भाजपचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आणण्यात येईल. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत; अन्यथा जाहीर माफी मागावी. त्यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करून आणि एक रुपया मानहानीचा दावा करणार आहे. असे पक्षाच्या वतीने वकील सतीश उके बाजू मांडतील”, असेही लोंढे यांनी स्‍पष्‍ट केले.

Back to top button