Pune News : पुणे जिल्ह्यात होणार पाच नवी पोलिस ठाणी; राज्यात नवीन 29 ठाण्यांचा प्रस्ताव गृह विभागाकडे | पुढारी

Pune News : पुणे जिल्ह्यात होणार पाच नवी पोलिस ठाणी; राज्यात नवीन 29 ठाण्यांचा प्रस्ताव गृह विभागाकडे

मुंबई/पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरांचा वाढता विस्तार आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता राज्यात नवीन 29 पोलिस ठाणी अस्तित्वात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव गृहविभागाकडे विचारधीन आहे. लवकरच त्यावर निर्णय होऊन मंजुरी दिली जाणार आहे. यात पुणे शहरात तीन, तर ग्रामीणसाठी दोन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण, जीवनमान पद्धतीत बदल, त्यानुसार गुन्ह्यांचे बदललेले स्वरूप लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस महासंचालकांनी गृह विभागाकडे नवीन 29 पोलिस ठाणी कार्यान्वित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.

राज्यात सद्य:स्थितीत 1107 पोलिस ठाणी आहेत. पोलिस शिपायापासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत सुमारे 2 लाख 43 हजारांच्या जवळपास संख्याबळ आहे. परंतु वाढत्या शहरीकरणाबरोबरच वाढत्या गुन्हेगारीचे स्वरूप आणि नवीन पोलिस ठाणे निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून पुणे शहर (3), ठाणे शहर (2), छत्रपती संभाजीनगर, नागपूर शहर (2), सोलापूर शहर, नवी मुंबई, पालघर (2), पुणे ग्रामीण (2), अहमदनगर (3), जळगाव, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला ग्रामीण, वाशिम, कोल्हापूर, जालना, बीड, नागपूर ग्रामीण (3) येथे नवीन पोलिस ठाण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्यातील एकूणच पोलिस ठाण्यांचा आढावा घेऊन नवीन पोलिस ठाण्यांचा विचार केला जाणार आहे. यामध्ये आणखी नव्या पोलिस ठाण्यांची भर पडून ही संख्या 50 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा

कोल्हापुरात होणार तीन नवी पोलिस ठाणी

नागपूरमध्ये पावसाचा हाहा:कार; दुकानं, घरांमध्ये शिरलं पाणी, शाळांना सुट्टी जाहीर

शरद पवार समर्थक आमदारांना अपात्र करा : अजित पवार गटाची आक्रमक भूमिका

Back to top button