मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 जणांची आमदारकी रद्द करावी, यासाठी शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांना नुकतेच पत्र दिले होते. यावर पलटवार करीत अजित पवार गटानेही आक्रमक भूमिका घेत शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ अपात्र करा, अशी मागणी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार समर्थक आमदारांवर पक्षविरोधी कृती केल्याचा ठपका या पत्रात ठेवण्यात आला आहे. या आमदारांची कृती मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात असल्याचे अजित पवार गटाने नमूद केले आहे.
अजित पवार गटाने नार्वेकर यांना दिलेल्या पत्रातून शिरूरचे विधानसभेतील आमदार अशोक पवार यांना वगळले आहे. ते लवकरच आपल्या तंबूत येतील, अशी अपेक्षा यामागे असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमचाच खरा पक्ष असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. याबाबत थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिकाही दाखल झाल्या आहेत. आता अजित पवार गटाने
विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्यामुळे पक्षातील दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पक्षफुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेणार नसल्याचे निश्चित केले होते. पक्षातील बहुतांश आमदार आणि नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला होता. मात्र, शरद पवार यांनी अजित पवार समर्थक मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघात सभा घेऊन आव्हान दिल्यामुळे अजित पवार समर्थक नाराज झाले आहेत. या सभांनाही प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तरदायी सभा घेतल्या जात आहेत. यावरून आता भविष्यातही दोन्ही गट आमने – सामाने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेले पत्र ही त्याची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे.
हे आमदार अजित पवारांच्या रडारवर
अजित पवार यांनी अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र दिलेल्याच्या यादीत विधानसभा सदस्य जयंत पाटील (इस्लामपूर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा- कळवा), अनिल देशमुख (काटोल), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), राजेश टोपे (घनसावंगी), प्राजक्त तनपुरे (राहुरी), रोहित पवार (कर्जत- जामखेड), सुमन पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ), सुनील भुसारा (विक्रमगड), संदीप क्षीरसागर (बीड) आणि विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, अरुण लाड आणि एकनाथ खडसे यांचा समावेश आहे.