मेक्सिकोत सापडले 1500 वर्षांपूर्वीच्या महालाचे अवशेष | पुढारी

मेक्सिकोत सापडले 1500 वर्षांपूर्वीच्या महालाचे अवशेष

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी युकाटन बेटावर सुमारे 1500 वर्षांपूर्वीच्या महालाचे अवशेष शोधले आहेत. या शाही इमारतीबरोबरच अन्य दोन आवासीय परिसरांचाही शोध घेण्यात आला आहे. माया संस्कृतीशी निगडीत हे एक महत्त्वाचे ठिकाण असल्याचे मानले जाते. या अवशेषांच्या अभ्यासातून माया संस्कृतीच्या काळातील समाज तसेच सामाजिक-आर्थिक जडण-घडण याबाबतची महत्त्वाची माहिती मिळू शकते.

पुरातत्त्व संशोधकांच्या टीमने अशा इमारतींचा छडा लावला आहे ज्या या पुरातत्वीय स्थळांवरील आवासीय भवनांचा पहिला पुरावा आहेत. त्याचा शोध माया ट्रेन रेल्वेमार्ग परियोजनेच्या आधीच लावण्यात आला आहे. ही 1500 किलोमीटर लांबीची रेल लाईन असेल जी युकाटन बेटावरून जाईल. मेक्सिकोच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अँथ्रोपोलॉजी अँड हिस्ट्रीने याबाबतची माहिती दिली आहे.

त्यानुसार ही महालासारखी संरचना 85 फूट लांबीची आहे. ती पक्षी, पंख आणि मोत्यांच्या नक्षीकामाने सजवली आहे. इमारतीच्या पुढील व्हरांड्यात आठ स्तंभ असून ते भिंतीला चिकटून आहेत. या संशोधनाचे नेतृत्व ‘आयएनएएच’चे पुरातत्त्व संशोधक लुर्डेस टोस्कानो हर्नांडेज यांनी केले. त्यांनी सांगितले की शहरावर शासन करणार्‍या लोकांची एक वंशावळ या इमारतींमध्ये राहत असावी.

अर्थात त्यांची नावे ज्ञात नाहीत. तेथील पक्षी, पंख आणि मोत्यांचे नक्षीकाम या महालात राहणारा अभिजात वर्ग आणि माया देवतांमधील संबंधांचे प्रतीक असू शकतात. हे अवशेष आतापर्यंत झाडा-झुडपांच्या दाटीत लपले होते.

Back to top button