पिंपरी : महिला सन्मान योजनेतून टपाल विभाग मालामाल | पुढारी

पिंपरी : महिला सन्मान योजनेतून टपाल विभाग मालामाल

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भारतीय टपाल विभागाच्या वतीने महिलांच्या विकासाला प्रेरणादायी ठरणारी महिला सन्मान बचत योजना सुरू केली आहे. साडेसात टक्के व्याजदर मिळत असल्याने या योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच महिन्यांत पिंपरी-चिंचवड टपाल उपविभागास सात कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
योजनेमध्ये ठेवलेल्या रकमेवर साडेसात टक्के व्याजदर नागरिकांना मिळत आहे. खासगी बँकांच्या तुलनेत अधिक व्याजदर मिळत असल्याने पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर पूर्व विभागात तब्बल 17 ते 18 हजार खाती उघडली आहेत. याद्वारे एकूण 12 कोटींचे उत्पन्न या संपूर्ण विभागास प्राप्त झाल्याने ही योजना यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे.

पुणे शहर पूर्वविभागाला 12 कोटी प्राप्त

एक एप्रिल ते एक सप्टेबर 2023 या पाच महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर पूर्व विभागात 18 हजार महिला सन्मान बचत खाती उघडण्यात आली. त्यातून पोस्टामध्ये 12 कोटी जमा झाले. गुंतवणूक केलेल्या रकमेवर 7.5 टक्के व्याज
मिळत आहे.

योजना अशी आहे

केंद्र सरकारच्या अर्थखात्याद्वारे ही महिला बचतपत्र योजना सुरू केली आहे. महिला आणि मुली जास्तीत जास्त दोन लाखपर्यंत रक्कम पोस्टात जमा करू शकतात. या प्रमाणपत्र खरेदीसाठी महिलांसाठी दोन वर्षांपर्यंतची कालमर्यादा निश्चित आहे.

आवश्यक कागदपत्रे

भारतीय टपाल विभागाच्या ठरणारी महिला सन्मान बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्डसह फोटो आवश्यक. तसेच अज्ञान मुलीच्या नावे खाते उघडण्यासाठी तिच्या आई-वडिलांचे पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मुलीचा फोटो आवश्यक आहे.
खासगी कंपन्यांच्या तुलनेत पोस्टाच्या या योजनेद्वारे अधिक व्याज मिळत आहे. त्यामुळे या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा.
– नितीन बने, 
जनसंपर्क डाक निरीक्षक, पिंपरी
हेही वाचा

Back to top button