Maharashtra Politics : माढ्यात मोहिते-पाटील विरुद्ध नाईक-निंबाळकर शीतयुद्ध टिपेला | पुढारी

Maharashtra Politics : माढ्यात मोहिते-पाटील विरुद्ध नाईक-निंबाळकर शीतयुद्ध टिपेला

– संजय पाठक, सोलापूर

माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील विरुद्ध खा. नाईक-निंबाळकर यांच्यात सुरू असलेला संघर्ष टिपेला पोहोचला आहे. त्यांच्यातील राजकीय कुरघोड्यांचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो, असे सध्याचे चित्र आहे.

माढ्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांनी आपले राजकीय भवितव्य प्रशस्त करून घेतले आहे. सातारा जिल्ह्यातील रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना गेल्यावेळेस भारतीय जनता पार्टीने संधी दिली. अर्थात त्याआधी पक्षाने मोहिते-पाटील घराण्यास आपल्याकडे वळवून घेतले. ज्यादिवशी मोहिते-पाटील घराण्याने राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर होत भाजपशी घरोबा केला, त्याच दिवशी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित झाला.

आता पाच वर्षांनंतरही या मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची ताकद आहे. परंतु, सध्या विविध कारणांवरून खा. नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते-पाटील घराण्यातील विविध सदस्यांमध्ये मतभिन्नता दिसत आहे. याचे लोण मोहिते-पाटलांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे यंदा जर पुन्हा एकदा खा. निंबाळकरांची उमेदवारी माथी मारण्याचा प्रयत्न झाला तर मोहिते-पाटील घराणे आणि त्यांचे कार्यकर्ते त्यास स्वीकारणार का असा प्रश्न आहे.

खा. नाईक निंबाळकरांविषयी नाराजी का?

नाईक-निंबाळकर खासदार झाल्यावर मोहिते-पाटलांच्या मर्जीनुसार काही काळ कार्यरत होते. त्यामुळे नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात सख्य होते. मात्र, हळूहळू नाईक-निंबाळकरांनी मोहिते-पाटलांचे माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक उत्तम जानकर, माढ्याचे आ. बबनराव शिंदे, करमाळ्याचे आ. संजय शिंदे यांच्याशी जवळीक वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले. यामुळे मोहिते-पाटील विरुद्ध नाईक-निंबाळकर यांच्यात वादाची ठिणगी पडली.

खा. नाईक-निंबाळकर यांनी याहून पुढे जात मोहिते-पाटलांना विश्वासात न घेता कृष्णा-भीमा स्थिरीकरणाविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला निवडक आमदारांना बोलावले. मोहिते-पाटलांच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत श्रेय लाटण्याचे खा. नाईक-निंबाळकरांचे हे डावपेच मोहिते-पाटलांना जिव्हारी लागले नसतील तर नवलच. याशिवायही जिल्ह्यातील पक्षांतर्गत निवडीप्रसंगीही मोहिते-पाटील विरुद्ध खा. नाईक-निंबाळकरांमध्ये छुपे शीतयुद्ध रंगले. या सार्‍याचा परिणाम म्हणजे मोहिते-पाटलांच्या मनामध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खा. नाईक-निंबाळकरांविषयी नाराजी वाढली आहे.

मोहिते-पाटलांचे डावपेच काय असू शकतात?

माढा लोकसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत खा. नाईक-निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी मिळू द्यायची नाही, अशी तयारी मोहिते-पाटील करत असल्याचे समजते. यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘माढा लोकसभा मतदारसंघ’ या नावाने व्हॉटस् अ‍ॅप् ग्रुप काढून खा. नाईक-निंबाळकरांविषयी त्या ग्रुपवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे सुरू केले आहे. दुसर्‍या बाजूला धैर्यशील मोहिते-पाटील यंदा लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकणार हा संदेश कार्यकर्त्यांत गेला आहे. आ. रामराजे निंबाळकर आणि मोहिते-पाटील घराण्यात हल्ली जवळीकता अधिक वाढली आहे. त्यामुळे माढ्याचे विद्यमान खा. नाईक-निंबाळकरांना संधी मिळू द्यायची नाही. अर्थात या सर्व गोष्टी सोलापूर जिल्ह्यासाठी ओपन सिक्रेट स्वरूपाच्या आहेत. आता यांच्या मनोमिलन होणार की नवाच पर्याय भाजपसाठी पुढे येणार हे लवकरच कळेल.

Back to top button